भारतीयांविरुद्ध 'अॅरोगन्स' दाखवून खेळा : संगकाराच्या 'टिप्स'

पीटीआय
मंगळवार, 6 जून 2017

भारताविरुद्धच्या सामन्यात मॅथ्यूजच्या सहभागाची दाट शक्‍यता असताना संगकाराला मात्र षटकांच्या कमी वेगाबद्दल चिंता आहे. श्रीलंकेचा सर्वोत्तम फलंदाज व कर्णधार असणारा अँजेलो मॅथ्यूज जर पुढील सामन्यासाठी उपलब्ध नसला तर श्रीलंकेला भारताविरुद्ध जिंकणे फार अवघड होईल.

लंडन : भारताला नमविण्यासाठी श्रीलंकेच्या युवा खेळाडूंनी मग्रुरी (अॅरोगन्स) दाखवूनच खेळ करावा लागेल, असे मत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने व्यक्त केले.

चॅंपियन्स करंडक स्पर्धेत गुरुवारी (ता. 8) भारत आणि श्रीलंका आमनेसामने येणार आहेत. श्रीलंकेची या स्पर्धेतील सुरवात एखाद्या दुःखद स्वप्नाप्रमाणे झाली. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजच्या पोटरीला दुखापत झाल्याने तो पहिल्या सामन्याला मुकला होता. त्यातच षटकांचा वेग कमी राखल्यामुळे हंगामी कर्णधार उपूल थरंगावर दोन सामन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. 

भारताविरुद्ध खेळताना युवा श्रीलंकन खेळाडूंनी पूर्ण जोशात गर्व वाटेल असा खेळ करावा. संघातील खेळाडूंनी सकारात्मक खेळ करुन आपली प्रतिभा सिद्ध करावी. असा खेळ केला तरच ते भारताला हरवू शकतात. परंतु, पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवणारा भारतीय संघ चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने हे एवढे सोपे नाही, असे संगकाराने एका क्रिकेट प्रशासक समितीच्या संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखात म्हटले.

भारताविरुद्धच्या सामन्यात मॅथ्यूजच्या सहभागाची दाट शक्‍यता असताना संगकाराला मात्र षटकांच्या कमी वेगाबद्दल चिंता आहे. श्रीलंकेचा सर्वोत्तम फलंदाज व कर्णधार असणारा अँजेलो मॅथ्यूज जर पुढील सामन्यासाठी उपलब्ध नसला तर श्रीलंकेला भारताविरुद्ध जिंकणे फार अवघड होईल. मॅथ्यूज जरी तंदुरुस्त असला तरी थरांगा संघात नसणे हे खूप मोठे नुकसान आहे. मलिंगासारखा अनुभवी गोलंदाज आणि सोबत दोन फिरकी गोलंदाज असूनही श्रीलंकेला 50 षटके टाकण्यासाठी अतिरिक्त 39 मिनिटे लागली हे पटण्यासारखे नाही, असे संगकाराने स्पष्ट केले.