पराभव टळल्यामुळे स्मिथचा सुटकेचा निःश्‍वास

वृत्तसंस्था
शनिवार, 3 जून 2017

तीन फलंदाज बाद झाले असले, तरी अजूनही आमच्याकडे चांगले फलंदाज होते; परंतु न्यूझीलंडचे पारडे जड होते. या सामन्याच्या अनुभवातून आम्हाला आता अधिक मेहनत करावी लागणार आहे.

बर्मिंगहॅम : न्यूझीलंडविरुद्धचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला; परंतु या सामन्यात आम्हाला लौकिकाप्रमाणे खेळ करता आला नाही, अशी कबुली ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने दिली. याचवेळी त्याच्या चेहऱ्यावर पावसाने पराभवातून सुटका केल्याची भावना स्पष्ट होत होती. 

विश्‍वविजेत्या ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेत अपेक्षित सुरवात करता आली नाही. प्रथम न्यूझीलंडने 45 षटकांत 291 धावा उभारल्या. त्यानंतर त्यांची नऊ षटकांत 3 बाद 53 अशी अवस्था झाली होती. स्मिथच्या मते, ऑस्ट्रेलिया पिछाडीवर नव्हती; परंतु सुरवात चांगली नव्हती. 

सामना अनिर्णित राहिल्याचे जाहीर केल्यानंतर स्मिथ म्हणाला, 'तीन फलंदाज बाद झाले असले, तरी अजूनही आमच्याकडे चांगले फलंदाज होते; परंतु न्यूझीलंडचे पारडे जड होते. या सामन्याच्या अनुभवातून आम्हाला आता अधिक मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाजीतही सुधारणा करावी लागणार आहे. त्यामुळे या पहिल्या सामन्यातून सुटका झाली, असेच म्हणावे लागेल. 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने मात्र सावध भूमिका घेतली. आम्ही चांगला खेळ करत आहोत. अशा खेळानंतर त्याचे आपल्या बाजूने निकाल लागणे महत्त्वाचे असते; पण क्रिकेट हा 'फनी' खेळ आहे. पावसाचा व्यत्यय असताना डकवर्थ लुईसच्या नियमाप्रमाणे नवे समीकरण दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला कदाचित फायदेशीर ठरू शकते. 

स्मिथ फलंदाजीपेक्षा गोलंदाजीवर नाराज होता. गेल्या काही वर्षांतील ही सर्वांत सुमार गोलंदाजी होती. विकेटच्या दोन्ही बाजूंना आम्ही स्वैर मारा केला. फटकेबाजीला सोपे होतील असे भरपूर चेंडू आम्ही टाकले, असे स्पष्ट मत स्मिथने मांडले; परंतु यावरही न्यूझीलंड कर्णधार विलिमसनने संयमानेच मतप्रदर्शन केले. प्रतिस्पर्धी कशी गोलंदाजी करत आहेत, यापेक्षा आपल्याला कशी फलंदाजी करायची आहे, याचा विचार आम्ही केला. त्यांच्याकडून चांगली गोलंदाजी होत नसेल, तर त्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. शेवटी ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी क्रिकेट विश्‍वातील एक सर्वोत्तम गोलंदाजी आहे.