क्रिकेट: विल्यमसनचे धडाकेबाज शतक; न्यूझीलंड सर्वबाद 291

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 जून 2017

धावफलक: 
न्यूझीलंड : 45 षटकांत सर्वबाद 291 
मार्टिन गुप्टील 26, ल्युक रॉंची 65, केन विल्यमसन 100, रॉस टेलर 46 
जोश हेझलवूड 9-0-52-6, जॉन हेस्टिंग्ज 9-0-69-2

बर्मिंगहॅम : ल्युक रॉंचीची धडाकेबाज सुरवात, रॉस टेलर आणि कर्णधार केन विल्यमसनची 99 धावांची भागीदारी आणि विल्यमसनच्या अफलातून शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने चँपियन्स करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियासमोर 292 धावांचे आव्हान उभे केले. डावाच्या शेवटच्या टप्प्यात केवळ 37 चेंडूंत सात विकेट घेत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या धावगतीला वेसण घातली. 

या सामन्यात जवळपास दीड तास पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे सामना प्रत्येकी 46 षटकांचा करण्यात आला. विल्यमसनने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मार्टिन गुप्टील आणि रॉंची यांनी धडाक्‍यात सुरवात केली. रॉंचीने 43 चेंडूंतच 65 धावा चोपल्या. ऑस्ट्रेलियाला पहिले यश सहाव्या षटकात मिळाले, तेव्हा न्यूझीलंडने 40 धावा केल्या होत्या. 'वन डाऊन' आलेल्या विल्यमसनने नेहमीच्या शैलीत फलंदाजी केली. सुरवातीला स्थिरावत नंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. 

रॉस टेलरनेही 46 धावा करत विल्यमसनला चांगली साथ दिली. पण जोश हेझलवूडने सहा गडी बाद करत न्यूझीलंडला रोखले. डावातील 45 व्या षटकात तीन गडी बाद करत हेझलवूडने न्यूझीलंडचा डावच संपविला. 

जागतिक पातळीवरील स्पर्धेत न्यूझीलंडची ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी 1996 मध्ये चेन्नईत त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 286 धावा केल्या होत्या. 1999 नंतर त्रयस्थ ठिकाणी झालेल्या 19 लढतींमध्ये ऑस्ट्रेलियाने 18 विजय मिळविले आहेत.