'चँपियन्स'मधील जेतेपद राखण्यासाठी भारताची कसोटी

वृत्तसंस्था
रविवार, 11 जून 2017

फलंदाजीमध्ये केदार जाधवला एकाच सामन्यात संधी मिळाली असली, तरीही दोन्ही सामन्यांत त्याचे क्षेत्ररक्षण अपेक्षेनुसार झाले नाही. त्यामुळे अजिंक्‍य रहाणे किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

लंडन : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तीनशेहून अधिक धावा केल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागल्याने चँपियन्स करंडक स्पर्धेतील विजेतेपद राखण्याच्या भारताच्या आशेला मोठा धक्का बसला. आता या धक्‍क्‍यातून सावरत कर्णधार विराट कोहलीच्या संघाला उद्या (रविवार) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कामगिरी उंचावणे अत्यावश्‍यक आहे. या सामन्यात विजय मिळविल्यास भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल होईल. अन्यथा या संघाला परतीचा मार्ग धरावा लागेल. 

श्रीलंकेविरुद्धच्या लढतीमध्ये डावाच्या मधल्या षटकांमधील फलंदाजी भारताची डोकेदुखी ठरली होती. त्यानंतर गोलंदाजांनाही प्रभावी कामगिरी करता आली नाही. फलंदाजीमध्ये पहिली दहा षटके आणि शेवटची दहा षटके भारताची धावगती चांगली होती. पण मधल्या टप्प्यात धावगती खालावली होती. त्यामुळे कदाचित दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथम फलंदाजी करावी लागली, तर हार्दिक पांड्या किंवा महेंद्रसिंह धोनी या दोघांपैकी एकाला धावगती उंचावण्यासाठी फलंदाजीत बढती दिली जाण्याची शक्‍यता आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराजसिंग, पांड्या आणि धोनी या सगळ्यांनीच सराव सामने आणि मुख्य स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे फलंदाजांना चांगला सूर गवसला असला, तरीही 'स्ट्राईक रेट' हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. 

भारतीय गोलंदाजीची मदार असलेल्या रवींद्र जडेजा, भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रित बुमराह या तिघांनाही श्रीलंकेच्या फलंदाजांनी दाद दिली नाही. सध्या 'डेथ ओव्हर्स'मध्ये अचूक गोलंदाजी करणाऱ्या काही मोजक्‍या गोलंदाजांमध्ये भुवनेश्‍वर आणि बुमराह या दोघांचीही गणना केली जाते. पण तेदेखील श्रीलंकेच्या फलंदाजांना रोखू शकले नाहीत. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजीमध्ये काही बदल करावे लागू शकतील. सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाज असलेल्या आर. आश्‍विनला पहिल्या दोन्ही सामन्यांत संधी मिळाली नव्हती. इंग्लंडमध्ये सध्या वेगवान गोलंदाजांना अपेक्षित साथ मिळत नसल्याचे आतापर्यंतच्या सामन्यांतून दिसून येत आहे. त्यामुळे भुवनेश्‍वर किंवा बुमराहला वगळून आश्‍विनला संघात स्थान मिळू शकते. 

फलंदाजीमध्ये केदार जाधवला एकाच सामन्यात संधी मिळाली असली, तरीही दोन्ही सामन्यांत त्याचे क्षेत्ररक्षण अपेक्षेनुसार झाले नाही. त्यामुळे अजिंक्‍य रहाणे किंवा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.