'किलर' मिलरचे शतक; आफ्रिकेचा विक्रमी विजय 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 ऑक्टोबर 2016

डर्बन: दीर्घ कालावधीनंतर सूर गवसलेल्या डेव्हिड मिलरच्या घणाघाती शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्येही ऑस्ट्रेलियाचा चार गडी आणि चार चेंडू राखून पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाच्या 372 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने 49.2 षटकांत पूर्ण केला. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावसंख्येच्या यशस्वी पाठलागांमधील पहिले दोन विक्रम आता दक्षिण आफ्रिकेच्याच नावावर आहेत. 

या आव्हानाच्या पाठलागादरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या डावातील 31 व्या षटकात आवश्‍यक धावगती आठपेक्षा अधिक झाली होती. त्यावेळी मिलर 26 धावांवर होता. 32 व्या षटकात जेपी ड्युमिनी बाद झाला. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेची स्थिती 5 बाद 217 अशी होती. त्यावेळी विजयासाठी आणखी 155 धावांची गरज होती. त्यावेळी नवोदित अँडिल फेहलूक्वायोच्या साथीत मिलरने 70 चेंडूंत 107 धावांची भागीदारी करत विजय आवाक्‍यात आणला. मिलरने 79 चेंडूंत नाबाद 118 धावा केल्या. फेहलूक्वायोने 39 चेंडूंत नाबाद 42 धावा केल्या. सलामीला क्विंटन डिकॉक (70) आणि हाशिम आमला (45) यांनी दक्षिण आफ्रिकेला भक्कम सुरवात करून दिली. त्यानंतर फाफ डू प्लेसिसनेही उपयुक्त योगदान दिले. 

तत्पूर्वी, डेव्हिड वॉर्नर (107 चेंडूंत 117) आणि स्टीव्ह स्मिथ (107 चेंडूंत 108) या दोघांनी शतके झळकावित ऑस्ट्रेलियाला या मालिकेत प्रथमच समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. याआधीचे दोन्ही सामने गमावलेले असल्याने या सामन्यातील विजय ऑस्ट्रेलियासाठी अत्यावश्‍यक होता. ट्रॅव्हिस हेडने 18 चेंडूंत 35 धावा करत दक्षिण आफ्रिकेला शेवटचा तडाखा दिला. त्याने आणि मॅथ्यू वेडने शेवटच्या तीन षटकांतच 46 धावा केल्या. 

संक्षिप्त धावफलक : 
ऑस्ट्रेलिया: 50 षटकांत 6 बाद 371 

डेव्हिड वॉर्नर 117, ऍरॉन फिंच 53, स्टीव्ह स्मिथ 108, जॉर्ज बेली 28, मिशेल मार्श 2, ट्रॅव्हिस हेड 35, मॅथ्यू वेड नाबाद 17 
अवांतर: 11 
गोलंदाजी: 
डेल स्टेन 2-96, कागिसो रबाडा 1-86, ड्‌वेन प्रिटोरियस 0-42, इम्रान ताहीर 2-54, अँडिल फेहलूक्वायो 1-58, जेपी ड्युमिनी 0-32 

दक्षिण आफ्रिका: 49.2 षटकांत 6 बाद 372 
क्विंटन डिकॉक 70, हाशिम आमला 45, फाफ डू प्लेसिस 33, रिली रॉसू 18, जेपी ड्युमिनी 20, डेव्हिड मिलर नाबाद 118, ड्‌वेन प्रिटोरियस 15, अँडिल फेहलूक्वायो नाबाद 42 
अवांतर: 11 
गोलंदाजी: 
ख्रिस ट्रेमेन 1-65, डॅनियल वॉरल 0-78, जॉन हेस्टिंग्ज 2-79, मिशेल मार्श 1-61, ऍडम झम्पा 1-55, ट्रॅव्हिस हेड 1-31