दीप्ती-पूनमची विश्वविक्रमी सलामी पुरुषांपेक्षाही सरस

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

विक्रमांचा धडाका 

  • महिला क्रिकेटमधील 320 धावांची सर्वोत्तम भागीदारी, यापूर्वीची 268 (इंग्लंडच्या टेलर - ऍटकिन्स, वि. आफ्रिका) 
  • भारताची सर्वोत्तम भागीदारी, यापूर्वी नाबाद 258 (रेश्‍मा गांधी- मिताली राज, वि. आयर्लंड, 1999) 
  • दीप्ती शर्माच्या 188 धावा, भारताच्या सर्वोत्तम, जया शर्मा (नाबाद 138, वि. पाकिस्तान, 2005) मागे टाकले 
  • जागतिक महिला क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाच्या धावा बेलिंडा क्‍लार्क (229 नाबाद सर्वोत्तम) 
  • भारताच्या सर्वोत्तम 358 धावा, जागतिक क्रमवारीत दहाव्या 
  • 175 पेक्षा जास्त धावा करणारी सर्वांत लहान खेळाडू (पुरुष आणि महिला धरून)

मुंबई : दीप्ती शर्मा आणि पूनम राऊतने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम सलामी केली. त्यांनी महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम 320 धावांची भागीदारी केली. एवढेच नव्हे, तर त्यांनी पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीपेक्षा सरस भागीदारी केली. 

मुंबईची पूनम आणि 19 वर्षीय दीप्तीने दक्षिण आफ्रिकेतील चौरंगी स्पर्धेत पॉट्‌चेफस्ट्रुम शहरात आयर्लंडविरुद्ध ही कामगिरी केली. पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी 286 धावांची आहे. उपुल थरंगा आणि सनत जयसूर्याने इंग्लंडविरुद्ध 2006 मध्ये 286 धावांची सलामी दिली होती. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील हीच सर्वोत्तम सलामी आहे; मात्र दीप्ती आणि पूनमने यापेक्षा सरस भागीदारी केली. 

ही भागीदारी महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलीच त्रिशतकी भागीदारी ठरली. त्यांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम 331 धावांच्या भागीदारीच्या सचिन तेंडुलकर - राहुल द्रविडचा विक्रमापेक्षा सरस कामगिरी करण्यात थोडक्‍यातच अपयश आले. त्याचबरोबर महिला क्रिकेटमधील दुसरी एकदिवसीय शतकवीर होण्यात दीप्ती थोडक्‍यात अपयशी ठरली; मात्र भारतीय महिलांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथमच तीनशेचा टप्पा ओलांडला. भारताची यापूर्वीची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या 2 बाद 298 होती.