विंडीजच्या ड्वेन स्मिथची क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 मार्च 2017

गेल्या काही वर्षांपासून स्मिथ आयपीएल, कॅरेबियन प्रिमियर लीग, बांगलादेश प्रिमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे. 

किंग्जटन - वेस्ट इंडीजचा आक्रमक फलंदाज ड्वेन स्मिथ याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. 

स्मिथ हा सध्या पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाकडून खेळतो. कराची किंग्ज संघाविरुद्धच्या अंतिम सामन्यापूर्वी स्मिथने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. स्मिथने वेस्ट इंडीजसाठी अखेरचा सामना 2015 च्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळला होता. स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2003-04 मध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून पदार्पण केले होते. 

मर्यादित षटकांच्या सामन्यातील आक्रमक फलंदाज म्हणून स्मिथची ओळख होती. स्मिथने 105 एकदिवसीय सामन्यांत 1560 धावा आणि 61 बळी मिळविले आहेत. त्याचा तीन ट्वेंटी-20 विश्वकरंडक स्पर्धांमध्ये वेस्ट इंडीजच्या संघात समावेश होता. त्याने 33 ट्वेंटी-20 सामन्यात 582 धावा केल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून स्मिथ आयपीएल, कॅरेबियन प्रिमियर लीग, बांगलादेश प्रिमियर लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळत आहे.