इंग्लंडचा पाचशे धावांचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

स्टोक्‍सचेही शतक; भारतीयांचे दुसऱ्या दिवशी खराब क्षेत्ररक्षण

राजकोट - भारतात ५०० आणि १००० च्या नोटांची चर्चा जोरात सुरू आहे. इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ५००चा टप्पा पार करीत या मालिकेत टीम इंडियाच्या फिरकीचे नाणे खणखणीत चालणार नसल्याचाच इशारा दिला. भारतीयांनी खराब क्षेत्ररक्षण करीत इंग्लंडची धावसंख्या वाढण्यास हातभारच लावला. भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या दिवसातील २३ षटके खेळून काढली असली, तरी तिसऱ्या दिवशी भारतीय कसे प्रत्युत्तर देणार, यावरच सर्व काही अवलंबून असेल.

स्टोक्‍सचेही शतक; भारतीयांचे दुसऱ्या दिवशी खराब क्षेत्ररक्षण

राजकोट - भारतात ५०० आणि १००० च्या नोटांची चर्चा जोरात सुरू आहे. इंग्लंडने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ५००चा टप्पा पार करीत या मालिकेत टीम इंडियाच्या फिरकीचे नाणे खणखणीत चालणार नसल्याचाच इशारा दिला. भारतीयांनी खराब क्षेत्ररक्षण करीत इंग्लंडची धावसंख्या वाढण्यास हातभारच लावला. भारतीय सलामीवीरांनी दुसऱ्या दिवसातील २३ षटके खेळून काढली असली, तरी तिसऱ्या दिवशी भारतीय कसे प्रत्युत्तर देणार, यावरच सर्व काही अवलंबून असेल.

जो रुट आणि मोईन अली यांच्यापाठोपाठ बेन स्टोक्‍सने शतक करीत भारतीयांवर दडपण वाढवले. भारताविरुद्धच्या यापूर्वीच्या तीन डावांत भोपळाही फोडू न शकलेल्या स्टोक्‍सने पहिल्या सत्रात भारतीयांवर हल्ला केला. त्यामुळे इंग्लंडने १३९ धावा करीत भारतीयांच्या प्रतिकाराच्या आशाच संपवल्या. त्यापैकी ६५ धावा स्टोक्‍सच्या होत्या. भारतात पहिल्या डावातच जास्तीत जास्त धावा करायच्या असतात, हा धडा इंग्लंडने चांगला गिरवल्याचे या कसोटीत तरी दिसले.

खेळपट्टी पूर्ण फलंदाजीस साथ देणारी नव्हती. काही चेंडू अचानक फिरकी घेत होते; तसेच खालीही राहत होते किंवा उसळत होते. अश्विनच्या याच प्रकारच्या चेंडूने चकल्यावर स्टोक्‍स हसला. कारण त्या वेळी इंग्लंडने ४००च्या नजीक मजल मारली होती. दडपणाखाली भारतीय कोलमडतात, हे पुन्हा दिसले. गौतम गंभीरकडे चेंडू गेल्यावर इंग्लंड फलंदाज सहज एक धाव जास्त घेत होते. मिड ऑनवर असूनही अमित मिश्रा एक धाव देत होता. भक्कम यष्टीरक्षक समजल्या जात असलेल्या वृद्धीमान साहा याने स्टोक्‍सचे दोन झेल सोडले. आता भारतात त्याच्यावरही ३००पेक्षा जास्त धावांचे यष्टीरक्षण करण्याची वेळ प्रथमच आली होती. त्याने दुसरा सोडलेला झेल तर खूपच सोपा होता.

साहाची साथ न लाभल्याने स्टोक्‍सला बाद करण्यात दोनदा अपयशी ठरलेल्या यादववर हल्ला करूनच शतकवीर मोईनने आक्रमण सुरू केले. शमीने त्याला बाद केले; पण इंग्लंडच्या धावांचा वेग कमी झाला नाही. बेअरस्टॉ आणि स्टोक्‍स चांगलेच बहरात होते. त्यांनी जडेजाचे स्वागत ११ धावा वसूल करीत केले.

मुरली विजय आणि गौतम गंभीरने जास्त डोकेदुखी टाळली. इंग्लंडने सलामीवीरांविरुद्ध सर्व उपाय केले. आता तिसऱ्या दिवशी पूर्ण ताकदीने येणारा स्टोक्‍स; तसेच खेळपट्टीचे रूप पाहता भारतासमोरील पहिले आव्हान फॉलोऑन टाळणेच असेल. तो टप्पा अजून २७५ धावांनी दूर आहे.

धावफलक -
इंग्लंड, पहिला डाव - अलीस्टर कूक पायचीत गो. जडेजा २१, हासीब हमीद पायचीत गो. अश्‍विन ३१, ज्यो रुट झे. व गो. यादव १२४, बेन डकेट झे. रहाणे गो. अश्‍विन १३, मोईन अली त्रि. गो. शमी ११७, बेन स्टोक्‍स झे. साहा गो. यादव १२८, जॉनी बेअरस्टॉ झे. साहा गो. शमी ४६, ख्रिस वोक्‍स झे. साहा गो. जडेजा ४, आदिल रशीद झे. यादव गो. जडेजा ५, झफर अन्सारी पायचीत गो. मिश्रा ३२, स्टुअर्ट ब्रॉड नाबाद ६, अवांतर - १०, एकूण - सर्व बाद ५३७.
बाद क्रम - १-४७, २-७६, ३-१०२, ४-२८१, ५-३४३, ६-४४२, ७-४५१, ८-४६५, ९-५१७.

गोलंदाजी - महंमद शमी २८.१-५-६५-२, उमेश यादव ३१.५-३-११२-२, आर. अश्‍विन ४६-३-१६७-२, रवींद्र जडेजा ३०-४-८६-३, अमित मिश्रा २३.३-३-९८-१.
भारत, पहिला डाव - मुरली विजय खेळत आहे २५, गौतम गंभीर खेळत आहे २८, अवांतर - १० एकूण - २३ षटकांत बिनबाद ६३.
गोलंदाजी - स्टुअर्ट ब्रॉड ५-१-२०-०, ख्रिस वोक्‍स ७-२-१७-०, मोईन अली ६-२-६-०, झफर अन्सारी ३-०-३-०, आदिल रशीद २-०-८-०.