विश्वविक्रमी धावसंख्येसह इंग्लंडचा पाकवर विजय

पीटीआय
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

संक्षिप्त धावफलक 
इंग्लंड - 50 षटकांत 3 बाद 444 (ऍलेक्‍स हेल्स 171-122 चेंडू, 22 चौकार, 4 षटकार, 140.16 स्ट्राईक रेट, ज्यो रुट 85-86 चेंडू, 8 चौकार, जॉस बट्‌लर नाबाद 90-51 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार, इऑन मॉर्गन नाबाद 57-27 चेंडू, 3 चौकार, 5 षटकार, महंमद आमीर 10-0-72-0, हसन अली 10-0-74-2, वहाब रियाझ 10-0-110-0, महंमद नवाझ 1-62) विजयी वि. पाकिस्तान 42.2 षटकांत सर्वबाद 275 (शरजिल खान 58, मोहम्मद आमीर 58)

नॉटिंगहॅम - ऍलेक्स हेल्सच्या 171 आणि जोस बटलर, इयान मॉर्गनच्या अर्धशतकांमुळे इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध 444 धावा करत विश्वविक्रम रचला. या धावसंख्येपुढे पाकिस्तानचा डाव 275 धावांत संपुष्टात आल्याने इंग्लंडने 169 धावांची विजय मिळविला. या विजयासह इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

 

इंग्लंडने वन-डे क्रिकेटमधील सांघिक धावसंख्येचा विश्‍वविक्रम केला. पाकिस्तानविरुद्ध ट्रेंटब्रीज मैदानावर तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडने 3 बाद 444 धावा केल्या. यापूर्वीचा उच्चांक त्यांनी एका धावेने मोडला. श्रीलंकेने 2006 मध्ये ऍमस्टलवीन येथील सामन्यात नेदरलॅंड्‌सविरुद्ध 9 बाद 443 धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून ऍलेक्‍स हेल्सने 171 धावांची खेळी केली. त्याचे हे होमग्राउंड आहे. त्याने ज्यो रूट याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी 248 धावांची भागीदारी रचली. हे दोघेही बाद झाल्यानंतर बटलर आणि मॉर्गन यांनी धावांची धडाका कायम ठेवताना पाकिस्तानी गोलंदाजांना निष्प्रभ ठरविले. बटलरने अवघ्या 51 चेंडूत 90 धावा ठोकल्या. तर, मॉर्गननेही 27 चेंडूत 57 धावांची खेळी केली.

या विशाल धावसंख्यासमोर पाकिस्तानची सुरवात खराब झाली. सलामीवीर सामी अस्लम 8 धावांवर ख्रिस वोक्सचा शिकार ठरला. तो बाद झाल्यानंतर एकाबाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. पण, शरजिल खानने चौकारांसह धावा जमाविणे सुरुच ठेवले होते. पण, तो 58 धावांवर बाद झाल्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. अखेर मोहम्मद आमीरने 22 चेंडूत अर्धशतक झळकावित संघाला मोठ्या पराभवापासून वाचविले.