पहिला एकदिवसीय सामना तुल्यबळ संघांतील लढत 

सुनंदन लेले 
बुधवार, 11 जुलै 2018

नॉटिंगहॅम : इंग्लंड संघाला टी-20 मालिकेतील अपयश पुसून काढायची चांगली खुमखुमी आहे. भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेत पराभूत करायला सुधारित खेळ करावा लागेल याची कल्पना असल्याने यजमान संघ जोरदार तयारीला लागला आहे. शेवटच्या टी-20 सामन्यात वगळले गेल्याचे शल्य मनात बाळगत नव्या जोमाने कसोटी संघाचा कप्तान ज्यो रूट भारतीय गोलंदाजांना त्रास द्यायला सज्ज होतोय. विराट कोहलीच्या संघाला संभाव्य आक्रमणाची जाणीव असल्याने भारतीय संघही संपूर्ण तयारीने ट्रेंट ब्रीज मैदानावर पाऊल ठेवणार आहे. 

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला नॉटिंगहॅम सामन्यापासून सुरवात होत असताना जाणकार या मालिकेचे वर्णन 'दोन तुल्यबळ संघांतील लढत' असे करत आहेत. इंग्लंड संघाने गेल्या पाच एकदिवसीय सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. 481 धावांची विश्वविक्रमी धावसंख्या उभारणाऱ्या इंग्लंड संघाचे फलंदाज जोमात आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. योगायोग म्हणजे ही विक्रमी धावसंख्या ट्रेंट ब्रीजच्या मैदानावरच उभारली गेली आहे. त्याच गोड स्मृती मनात साठवत इंग्लंड संघ मैदानात पाऊल ठेवेल. फलंदाजीची खात्री इंग्लंडला असली तरी गोलंदाजांची शंका त्यांना भेडसावत आहे. भारतीय फलंदाजांना रोखायचे कसे याचे उत्तर शोधताना इंग्लंड संघ व्यवस्थापनाला नाकी दम येतो आहे. 

भारतीय संघ नव्या विश्वास आणि उत्साहाने एकदिवसीय मालिकेला तोंड देणार आहे. इंग्लंडप्रमाणेच भारतीय संघाला थोडी चिंता गोलंदाजीची आहे. जसप्रीत बुमराची अनुपस्थिती चांगलीच जाणवणार आहे आणि भुवनेश्वर कुमार खेळणार का नाही हा प्रश्न आहे. विराट कोहली पहिल्या सामन्यात कोणा गोलंदाजाला संधी देतो हे बघणे उत्सुकतेचे असेल. ट्रेंट ब्रीज मैदानाची खेळपट्टी भरपूर रोलिंग करून फलंदाजीकरता पोषक बनवली जात असली तरी नॉटिंगहॅमची हवा काहीशी थंड असल्याने खेळपट्टी संपूर्ण कोरडी असायची शक्‍यता कमी वाटते. 

गुरुवारी वर्ल्डकप फुटबॉलचा कोणताच सामना नसल्याने पहिल्या एकदिवसीय सामन्याला नॉटिंगहॅमचे प्रेक्षक गर्दी करतील अशी आशा संयोजक बाळगून आहेत. सामन्याच्या दिवशी नॉटिंगहॅमला आकाशात ढग असतील आणि हवा आल्हाददायक असेल, असा अंदाज वर्तवला गेला आहे. 

Web Title: The first ODI match will be played between the teams