धरमशालेतील खेळपट्टी  भारतीयांसाठी चिंतेची

पीटीआय
गुरुवार, 23 मार्च 2017

नवी दिल्ली - चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात धरमशालेतील खेळपट्टी भारतीय संघाला चिंतेत टाकणारी राहील, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आत्मविश्‍वास उंचावणारी असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने बुधवारी व्यक्त केले.

नवी दिल्ली - चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात धरमशालेतील खेळपट्टी भारतीय संघाला चिंतेत टाकणारी राहील, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा आत्मविश्‍वास उंचावणारी असेल, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन याने बुधवारी व्यक्त केले.

धरमशालेतील खेळपट्टी ही हिरवी आणि वेगवान गोलंदाजांसाठी धार्जिणी राहील असा अंदाज आधीच वर्तविण्यात आला आहे. जॉन्सनने या अंदाजाची पुष्टी दिली. तो म्हणाला, ‘‘मी धरमशालेत एकदाच खेळलो आहे. त्या खेळपट्टीवर कायम गवत ठेवलेले असते. या वेळी फार काही वेगळे घडणार नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा आत्मविश्‍वास मिळेल, तर भारतीय संघ चिंतेत राहील. भारतीय संघाला या मालिकेत अति आत्मविश्‍वास बाळगल्याचा फटका बसला. मालिकेतील आतापर्यंतची स्थिती हेच दर्शवते.’’

मालिकेतील चौथी कसोटी शनिवारी (ता. २५) सुरू होईल. वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया जॅकसन बर्डला स्थान देण्यासाठी स्टिव ओकिफ याला वगळेल अशी चिन्हे आहेत. जॉन्सन म्हणाला, ‘‘या मालिकेत आतापर्यंत आमच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, या कसोटीत ऑस्ट्रेलियाने एक फिरकी गोलंदाज कमी करून वेगवान गोलंदाजाला स्थान देणे फायद्याचे ठरेल. फिरकी गोलंदाज निवडताना अनुभवाला प्राधान्य देताना लायनची निवड अपेक्षित राहील. त्याला चांगला बाउन्स मिळेल.’’

आव्हानात्मक स्थितीतून ऑस्ट्रेलियाने तिसरी कसोटी अनिर्णित राखल्याने ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्‍वासदेखील उंचावलेला असेल, असे सांगून जॉन्सन म्हणाला, ‘‘हॅंड्‌सकोम्ब आणि शॉन मार्श यांनी कमालीच्या संयमाने फलंदाजी करून तिसरी कसोटी अनिर्णित राखली. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा आत्मविश्‍वास उंचावला असेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघ केवळ स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर अवलंबून नाही हेदेखील स्पष्ट झाले. यापूर्वी अशा कठिण परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा डाव नेहमी गडगडला आहे. पण, या वेळी तसे घडले नाही. म्हणूनच मला चौथी कसोटी ऑस्ट्रेलिया जिंकेल असेच वाटते.’’

Web Title: Former Australian fast bowler Mitchell Johnson