जागतिक संघाची पाकमध्ये ट्‌वेंटी 20 मालिका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

लाहोर - पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याच्या मोहिमेस पाठिंबा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लाहोरला ट्‌वेंटी 20 लढतींसाठी जागतिक संघ पाठवण्याची तयारी दाखवली आहे. ही मालिका 22 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

लाहोर - पाकिस्तानातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सुरू करण्याच्या मोहिमेस पाठिंबा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने लाहोरला ट्‌वेंटी 20 लढतींसाठी जागतिक संघ पाठवण्याची तयारी दाखवली आहे. ही मालिका 22 ते 29 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

पाकिस्तानातील सुपर लीगचे यशस्वीरीत्या संयोजन झाल्यामुळे हा दौरा निश्‍चित झाला असल्याचे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या कार्यकारिणीचे प्रमुख नजम सेठी यांनी सांगितले. या दौऱ्याची चर्चा यापूर्वीच सुरू होती; पण पाक सुपर लीगमधील अंतिम लढतीच्या सुरळीत संयोजनाची आम्ही प्रतीक्षा करीत होतो, असे त्यांनी सांगितले.

पाकिस्तान सुपर लीगमधील अंतिम लढत कोणताही अडथळा न येता पार पडली. त्यास चाहत्यांचा छान प्रतिसादही लाभला. सुरक्षा उपाययोजना योग्यप्रकारे अमलात आणल्या गेल्या. त्यामुळे आता आम्ही अन्य देशांना पाकिस्तानात संघ पाठवण्यास तयार करू शकतो, असे सेठी यांनी सांगितले. त्यांनी केवळ जागतिक संघाविरुद्धची मालिकाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय लढतींचे आयोजनही शक्‍य असल्याचे सांगितले.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील मालिका ऑक्‍टोबरमध्ये अमिरातीत होणार आहे. ही मालिकाच मायदेशात खेळवण्याचा पाक मंडळाचा प्रयत्न आहे. त्यात यश न आल्यास किमान काही सामने पाकमध्ये व्हावेत यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आयसीसीच्या पाकिस्तान टास्क फोर्सचे प्रमुख गाईल्स क्‍लार्क यांच्या प्रयत्नामुळेच जागतिक संघाचा दौरा होण्याची शक्‍यता आहे. त्यांनी सामना सुरक्षेबाबत सातत्याने पंजाब सरकार अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांनी पाक सुपर लीगच्या संयोजनाबद्दल पाक मंडळाचे अभिनंदन करतानाच सप्टेंबरमध्ये भेटूच असे सांगितले आहे. त्यामुळे जागतिक संघ- पाकिस्तान यांच्यातील मालिकेस पुष्टी मिळत आहे. जागतिक संघ 17 सप्टेंबरला दुबईत एकत्र येईल आणि तेथून लाहोरला रवाना होईल, असे सांगितले जात आहे.