महाराष्ट्रासमोर आज बंगालचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

नवी दिल्ली - विजय हजारे करंडक राष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्रासमोर बुधवारी बंगालचे आव्हान असेल. साखळीतील फॉर्मची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर असेल. फिरोजशाह कोटला मैदानावर ही लढत दिवसा होईल. बंगालने मुंबईला हरविले असल्यामुळे महाराष्ट्रासमोर कडवे आव्हान राहील.

ओदिशामध्ये "ब' गटाच्या साखळीत महाराष्ट्राने सहा पैकी पाच सामने जिंकले होते. केवळ उत्तर प्रदेशविरुद्ध महाराष्ट्राला पराभूत व्हावे लागले होते. महाराष्ट्राने गटात दुसरे स्थान मिळविले होते, पण आघाडीवर राहिलेल्या तमिळनाडूला महाराष्ट्राने हरविले होते. कर्णधार केदार जाधव याच्यासह महाराष्ट्राच्या प्रमुख फलंदाजांना फॉर्म गवसला आहे. साखळीत महाराष्ट्राने तीन सामन्यांत त्रिशतकी धावसंख्या पार केली होती. हिमाचल प्रदेशविरुद्ध 376, केरळविरुद्ध 311, दिल्लीविरुद्ध 367 अशी कामगिरी महाराष्ट्राने केली होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने एक शतक, तीन अर्धशतकांसह 401 धावा फटकावल्या आहेत. कर्णधार केदारने एक शतक, दोन अर्धशतकांसह 331 धावा काढल्या आहेत. नौशाद शेखने चार अर्धशतकांसह 249 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत जगदीश झोपे व श्रीकांत मुंढे यांनी प्रत्येकी 14 विकेट घेतल्या आहेत. शमशुझ्मा काझी, निकीत धुमाळ यांनाही टप्पा गवसला आहे. बंगालनेही सहा पैकी पाच सामने जिंकले. "क' गटात बंगाल अव्वल आला. मुंबईवरील विजयामुळे बंगालचे मनोधैर्य उंचावले आहे.

महाराष्ट्राचा संघ दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत दाखल झाला. प्रशिक्षक श्रीकांत कल्याणी यांनी सांगितले की, आम्ही क्षमतेनुसार खेळ करण्याची गरज आहे. फलंदाजीत प्रमुख खेळाडूंना चांगला फॉर्म गवसला आहे. ही जमेची बाजू आहे. आता बाद फेरीचा टप्पा सुरू झाला आहे. साहजिकच सर्व संघ खेळ उंचावतील. त्यामुळे आम्हाला गाफील राहून चालणार नाही.