मी निवृत्तीचा विचार करत होतो.. : युवराज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 जानेवारी 2017

आमची गोलंदाजी पुन्हा ढिसाळ झाली. 3 बाद 25 अशा अवस्थेमध्ये आम्ही धोनी-युवराज या दोन धोकादायक फलंदाजांना स्थिरावण्याची संधी दिली. मग याचा फटका बसणारच! आम्ही खूप निराश झालो आहोत. 'हा सामना जिंकू' असे सुरवातीच्या काही षटकांनंतर आम्हाला वाटत होते. 
- इऑन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार

कटक : "कॅन्सरशी झगडून मी पुन्हा मैदानात पाऊल टाकले; पण संघासाठी माझी कामगिरी अपेक्षेप्रमाणे होत नव्हती. यामुळे मी संघातून बाहेरही गेलो.. 'आता क्रिकेट खेळायचे की थांबायचे' असा विचार त्यावेळी माझ्या मनात येत होता..'' अशा शब्दांत भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराजसिंगने काल (गुरुवार) भावना व्यक्त केली. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघ अडचणीत असताना युवराजने प्रतिआक्रमण करत दीडशे धावा केल्या. 

2011 मध्ये भारतात झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा 'हिरो' ठरलेल्या युवराजला त्यानंतर कॅन्सरशी झगडावे लागले. यावर मात करून तो मैदानात परतला; पण संघाच्या गरजेनुसार त्याची कामगिरी होत नसल्याने त्याला नंतर वगळण्यात आले. यामुळे निराश होऊन तो क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार काही काळ करत होता, असे त्यानेच सांगितले. गेल्या वर्षी झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर युवराज पुन्हा संघाबाहेर गेला. त्यानंतर त्याने रणजी करंडक स्पर्धेत खोऱ्याने धावा करत निवड समितीचे लक्ष पुन्हा वेधून घेतले. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत युवराजला संधी मिळाली. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या युवराजने दुसऱ्या सामन्यात मात्र उपयुक्तता सिद्ध केली. 

कालच्या सामन्यात भारताची अवस्था तीन बाद 25 अशी झाली होती. यावेळी युवराज-महेंद्रसिंह धोनी या भारताच्या सर्वांत अनुभवी जोडीने संघाला सावरले आणि तब्बल 381 धावांचा डोंगर उभा करून दिला. या विजयानंतर युवराज काहीसा भावूक झाला होता. तो म्हणाला, "कॅन्सरवर मात करून पुन्हा संघात येणे हा प्रचंड संघर्ष होता. पण कसून प्रयत्न केल्यामुळेच हे साध्य झाले. मी वृत्तपत्रं वाचत नाही, टीव्हीही बघत नाही. त्यामुळे माध्यमांमधील चर्चांमुळे मी स्वत:वर दडपण घेत नाही. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत मी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे देशासाठीही असेच भरीव योगदान देण्यासाठी मी उत्सुक होतो. माही आणि मी एकत्र आलो, तेव्हा संघ अडचणीत होता. पण आम्ही दोघांनी यापूर्वीही भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. धोनी अनुभवी आहे आणि आता त्याची बहरलेली फलंदाजी पाहणे खरोखरीच सुखद वाटत आहे.''