रवींद्र जडेजा ‘क’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मार्च 2017

मुंबई - गतवर्षी तिसऱ्या श्रेणीत असूनही आयसीसीच्या जागतिक गोलंदाजी क्रमवारीत अव्वल आलेल्या रवींद्र जडेजास भारतीय क्रिकेट मंडळाने नव्या करारात ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्याचबरोबर चेतेश्‍वर पुजारा आणि मुरली विजय यांनाही बढती मिळाली.

मुंबई - गतवर्षी तिसऱ्या श्रेणीत असूनही आयसीसीच्या जागतिक गोलंदाजी क्रमवारीत अव्वल आलेल्या रवींद्र जडेजास भारतीय क्रिकेट मंडळाने नव्या करारात ‘अ’ श्रेणी दिली आहे. त्याचबरोबर चेतेश्‍वर पुजारा आणि मुरली विजय यांनाही बढती मिळाली.

भारतीय क्रिकेट मंडळाने या मोसमातील करारबद्ध खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. त्यात धवल कुलकर्णी आणि शार्दुल ठाकूर या मुंबईच्या मध्यमगती गोलंदाजांचा समावेश आहे. शार्दुल ठाकूर आणि महाराष्ट्राचा केदार जाधव यांचा नव्याने ‘क’ श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. धवलने हे ‘क’ श्रेणीच्या खेळाडूतील स्थान राखले आहे. गतवर्षी जडेजाला ‘क’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत स्थान मिळाले आहे. 

मानधनात वाढ
भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर सध्या प्रशासक समितीचा अधिकार आहे. ही हंगामी समिती असल्यामुळे ते केवळ खेळाडूंच्या बढती आणि खेळाडूंना वगळण्याबाबत निर्णय घेतील असे अपेक्षित होते. खेळाडूंच्या मानधनाच्या वाढीचा निर्णय त्यांच्याकडून अपेक्षित नव्हता. प्रत्यक्षात प्रशासक समितीने त्यांच्या मानधन वाढीचादेखील निर्णय घेतला. 

भारतीय मंडळाने यापूर्वीची यादी २०१५ च्या नोव्हेंबरमध्ये जाहीर केली होती, त्या वेळी ‘अ’ श्रेणीसाठी एक कोटी होते, पण हीच रक्कम दोन कोटींवर गेली आहे. ‘ब’ श्रेणीतील खेळाडूंना पन्नास लाखांऐवजी एक कोटी तर ‘क’ श्रेणीतील खेळाडूंना २५ ऐवजी पन्नास लाख मिळतील. आता कसोटीसाठी १५ लाख, एकदिवसीय लढतीसाठी सहा लाख आणि ट्‌वेंटी २० लढतीसाठी तीन लाख मिळतील. 

हरभजन, रैना ‘बे’करार 
खेळाडूंची श्रेणी निश्‍चित करताना प्रशासक समितीने काही धाडसी निर्णय घेताना सुरेश रैना आणि हरभजन सिंग या प्रमुख क्रिकेटपटूंना वगळले आहे. त्याचवेळी मायदेशातील क्रिकेट मोसमात सातत्याने अपयशी राहिलेल्या शिखर धवनला ‘ब’ श्रेणीतून ‘क’ श्रेणीत ढकलले आहे. दिल्लीचा यष्टिरक्षक रिषभ पंत याला ‘क’ श्रेणीत प्रथमच स्थान देण्यात आले आहे.

श्रेणीनुसार खेळाडू
‘अ’ श्रेणी
विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, आर. अश्‍विन, अजिंक्‍य रहाणे, चेतेश्‍वर पुजारा, रवींद्र जडेजा, एम विजय. 
नव्याने ः पुजारा, जडेजा, विजय
 

‘ब’ श्रेणी
रोहित शर्मा, के. एल. राहुल, भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, 
इशांत शर्मा, उमेश यादव, वृद्धिमान साहा, जसप्रीत बुमराह, युवराज सिंग. 
बाहेर ः सुरेश रैना, अंबाती रायडू, शिखर धवन, भुवनेश्‍वर कुमार

‘क’  श्रेणी
शिखर धवन, अंबाती रायडू, अमित मिश्रा, मनीष पांडे, अक्षर पटेल, करुण नायर, हार्दिक पंड्या, आशिष नेहरा, केदार जाधव, युझवेंद्र चाहल, पार्थिव पटेल, जयंत यादव, मनदीप सिंग, धवल कुलकर्णी, शार्दुल ठाकूर, रिषभ पंत.

बाहेर ः अमित मिश्रा, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, वरुण ॲरॉन, कर्ण शर्मा, हरभजन सिंग, एस. अरविंद.

Web Title: ICC rankings of the World