भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील निर्णायक कसोटी आजपासून

सुनंदन लेले
शनिवार, 25 मार्च 2017

धरमशाला -  आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर उद्या शनिवारी भारतातील धरमशाला या नव्या कसोटी केंद्राची नोंद होईल. येथील पदार्पणाच्या लढतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील निर्णायक चौथा कसोटी सामना खेळविण्यात येईल. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत असून, मालिकेचा निर्णय निश्‍चित होणाऱ्या या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली खेळण्याची शक्‍यता खूपच कमी दिसून येत आहे. कोहली खांद्याच्या दुखापतीतून अजून तंदुरुस्त नाही.

धरमशाला -  आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर उद्या शनिवारी भारतातील धरमशाला या नव्या कसोटी केंद्राची नोंद होईल. येथील पदार्पणाच्या लढतीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेतील निर्णायक चौथा कसोटी सामना खेळविण्यात येईल. आतापर्यंत तीन कसोटी सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत असून, मालिकेचा निर्णय निश्‍चित होणाऱ्या या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली खेळण्याची शक्‍यता खूपच कमी दिसून येत आहे. कोहली खांद्याच्या दुखापतीतून अजून तंदुरुस्त नाही.

पहिल्या तीनही कसोटींत बॅट आणि बॉल यांच्यातील युद्ध चांगलेच रंगले होते. पहिले दोन सामने निर्णायक ठरले, तर तिसरा अनिर्णित राहिला. त्यामुळे आता हिमालयाच्या कुशीत होणाऱ्या या चौथ्या सामन्यात असेच सर्वोत्तम आणि रोमांचित क्रिकेट बघायला मिळेल, अशी आशा आहे.

धरमशालेतील खेळपट्टीवर चेंडू उसळेल, असे क्‍युरेटर चौहान यांनी सांगितले असले, तरी सामन्याच्या पूर्वसंध्येला तशी शक्‍यता दिसून आली नाही. खेळपट्टीवरील सर्व गवत काढून टाकण्यात आल्यामुळे वेगवान गोलंदाजीला मदत मिळण्याची शक्‍यता कमीच आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळणार, अशी चर्चा करत असले, तरी प्रत्यक्षात ते दोन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजच उतरवतील, असे मानले जात आहे. मैदानाचा भार हा रेतीचा असल्यामुळे खेळाडूंना दमछाक जाणवेल, असेही बोलले जात आहे.

अय्यर, शमीचा समावेश
भारतीय संघात आता तरी बदलाची शक्‍यता नसली तरी श्रेयस अय्यर आणि गोलंदाज महंमद शमी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. कोहली तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरल्यास श्रेयस अय्यरला कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळेल आणि अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात श्रेयसने द्विशतकी खेळी केल्यामुळे त्याच्या नावाचा विचार झाला असावा.  येथील हवामान आणि खेळपट्टीचे स्वरुप लक्षात घेता शमीचा विचार करण्यात आला आहे. अंतिम ११ जणांची नावे उद्या सकाळीच जाहीर केली जातील. शमीला स्थान मिळाल्यास इशांत शर्माला बाहेर बसावे लागेल. हजारे करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत तमिळनाडू विरुद्धची कामगिरी शमीच्या पथ्यावर पडली आहे.

ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचा सामना
आयसीसीच्या वार्षिक कसोटी क्रमवारीसाठी १ एप्रिलपर्यंतची कामगिरी ग्राह्य धरण्यात येते. चार सामन्यांच्या मालिकेत एक सामना जिंकला, तरी भारताचे अव्वल स्थान टिकून राहणार होते. दुसरा सामना जिंकून भारताने ते सोपस्कार पार पाडले आहेत. त्यामुळे वार्षिक दहा लाख डॉलरचे भारताचे पारितोषिक निश्‍चित आहे. दुसऱ्या स्थानासाठी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चुरस आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध दोन सामने जिंकून ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले आहे. त्यांचादेखील एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धचा चौथा सामना किमान अनिर्णित राखणे आवश्‍यक आहे. असे झाले तरच त्यांचे दुसरे स्थान निश्‍चित होईल. ऑस्ट्रेलिया हरल्यास आणि दक्षिण आफ्रिकेने अखेरचा सामना अनिर्णित राखला तरी ते दुसऱ्या स्थानावर येतील.

नियम सगळ्यांकरता सारखा - विराट 
केलेले नियम सगळ्यांकरता सारखे आहेत. मी त्याला अपवाद कसा ठरेन. सामन्याअगोदर मी फिटनेस टेस्ट देईन आणि सामना संपूर्णपणे नीट खेळू शकेन तरच भाग घेईन. जर दुर्दैवाने मी खेळू शकलो नाही तरी संघाच्या ध्येयावर किंवा सामन्यावर त्याचा खास परिणाम होणार नाही. मला तर वाटते की माझी जागा घेणाऱ्या कर्णधार आणि फलंदाजासाठी ती मोठी संधी ठरेल. थोडक्‍यात कोण संघात खेळतो या पेक्षा संघात खेळणारा कसा खेळतो हे जास्त महत्त्वाचे आहे. धरमशालाची खेळपट्टी मला कसोटीकरता चांगली वाटत आहे. येथे फलंदाज आणि गोलंदाज दोघांना समान संधी मिळेल असा माझा अंदाज आहे. चालू मालिकेत आमचे खेळाडू सततच्या क्रिकेटने काहीसे थकले असले तरी या कसोटीचे मोल ते जाणतात. तेव्हा भारतीय संघ सर्व शक्तीनिशी लढेल याविषयी तिळमात्र शंका नाही.

मला कल्पना आहे की माध्यमांमधून बऱ्याच गोष्टी बोलल्या, दाखवल्या आणि लिहिल्या जात आहेत. मला इतकेच सांगायचे आहे की आम्ही खेळाडू याकडे जास्त लक्ष देत नाही. प्रत्येकाला आपले मत मांडायचा हक्क आहे. मला खरच कोण काय बोलत आहे लिहीत आहे वा दाखवत आहे याचा काही फरक पडत नाही. 

कसोटी चालू होत असताना लय कोणत्या संघाकडे आहे याची पण चर्चा होणे स्वाभाविक आहे. पहिल्या कसोटीत आमचा खेळ खराब झाला हे कबूल करावे लागेल. पण गेल्या दोन सामन्यांत कोणत्या संघाचा वरचष्मा होता हे वेगळे सांगायची गरज आहे का? मला खात्री आहे की भारतीय संघ चांगल्या खेळाची लय धरमशाला कसोटीत कायम ठेवेल.

अखेर क्रिकेट हा एक खेळ आहे - स्मिथ
कसोटीच्या आदल्या दिवशी आम्ही खेळाडू दलाई लामांना भेटून आलो. काय ऋषितुल्य माणूस आहे! काय करुणा आणि तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे. पृथ्वीतलावरची सगळी माणसेसारखी आहेत आणि आपण सगळे एक आहोत हेच त्यांनी समजावले. दलाई लामांना भेटल्यावर मला जाणवले की क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्यात कितीही जीव ओतून खेळले तरी तो एक सामना आहे. खरे आयुष्य खूप मोठे आणि वेगळे आहे. मला आशा आहे की अशा महान माणसाला भेटून मला शांत झोपेची समस्या आहे ती दूर होईल. दलाई लामांच्या नाकाला नाक घासून मी त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.

क्रिकेट बद्दल बोलायचे झाले तर विराट कोहली खेळला नाही तरी भारतीय संघ उत्तम खेळ करेल असे मला वाटते. विराट कोहली सोडूनही भारतीय संघात खूप चांगले खेळाडू आहेत हे आम्ही जाणतो. माझे जास्त लक्ष भारतीय संघावर नसून माझ्या संघावर आहे. पॅट कमिन्स या मैदानावर जास्त परिणामकारक गोलंदाजी करेल अशी मला खात्री आहे. आम्ही इतका कडवा प्रतिकार करू असे कोणाला वाटले नव्हते. मालिकेच्या तयारीत मन गुंतवल्याचा फायदा ऑसी संघाला झाला आहे. 

नाणेफेक कोण जिंकणार यापेक्षा पहिल्या डावात कोण कसा खेळ करतो याचा सामन्यावर मोठा परिणाम होईल. बंगळूर आणि रांची कसोटीत आम्ही चांगला खेळ केला तरी त्यात अजून योग्यवेळी भर टाकता आली नाही म्हणून आम्ही अडचणीत आलो. ही कसोटी आम्हा खेळाडूंना आपापले कसब दाखवायची एक छान संधी देणार आहे. कोण दडपणाखाली सर्वोत्तम खेळ करायची हिंमत दाखवतो तोच संघ यशस्वी होणार आहे.

Web Title: India-Australia Test series starting today