पुजारा-रहाणे भागीदारीने रंगत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

दुसऱ्या कसोटीत भारत 126 धावांनी पुढे

दुसऱ्या कसोटीत भारत 126 धावांनी पुढे
बंगळूर - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात बंगळूरला बॅट-बॉलमधील उंदीर-मांजराचा खेळ सलग तिसऱ्या दिवशी चालू राहिला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 276 धावांवर संपवल्यावर पुनरागमनाची नामी संधी भारताला मिळाली. पहिल्या डावाच्या तुलनेत भारतीय फलंदाजांनी खिंड लढवायला मनापासून केलेले प्रयत्न हाणून पाडायला ऑसी गोलंदाजांनी दर थोड्या वेळाने एका फलंदाजाला बाद करायचा सपाटा लावला. सामना ऑस्ट्रेलियाकडे झुकणार, अशी भीती वाटू लागली असताना पाचव्या विकेटकरिता पुजाराने रहाणेसह अत्यंत मोलाची 93 धावांची अतूट भागीदारी रचली.

तिसऱ्या दिवशी खेळ संपला असताना दुसऱ्या डावात 4 बाद 213 धावा झाल्या होत्या. आघाडीचे वजन 126 धावांचे जमा झाले आहे. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या चार फलंदाजांना लवकरात लवकर बाद करायच्या जिद्दीने भारतीय गोलंदाज मैदानात उतरले. पहिला अर्धा तास वेड-स्टार्कने व्यवस्थित खेळून काढल्यावर पोटात गोळा यायला लागला होता. स्टार्कला षटकार मारण्याचा मोह नडला आणि अश्‍विनला पहिले यश मिळाले. तीन तास चिवट फलंदाजी करून वेड 40 बहुमूल्य धावा करून जडेजाला पायचीत झाला. लायनला जडेजाने लगेच पायचीत केले. हेझलवूडला बाद करून जडेजाने सहावा बळी घेतला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव अखेर संपला.

दुसऱ्या डावात भारताची सलामीची जोडी मैदानात उतरली तेव्हा राहुलने परत आत्मविश्‍वासपूर्ण फलंदाजी चालू केली. सुरवातीच्या अडखळण्यानंतर मुकुंदही जरा स्थिरावला. अपेक्षित यश लगेच मिळाले नाही तेव्हा ऑसी गोलंदाज फलंदाजांशी बोलाचाली करू लागले. कधी नव्हे ती 39 धावांची सलामी जमा झाली होती. हेझलवूडचा सरळ वेगवान चेंडू पाय न हलवता खेळताना मुकुंद बोल्ड झाला. राहुलने सलग दुसऱ्या डावात अर्धशतकी मजल मारून सातत्य दाखवले. भेदक गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांना सहजी तोंड देणारा राहुल बाद झाला तो ओकीफच्या डंख नसलेल्या चेंडूवर. राहुलचा स्मिथने स्लिपमधे पकडलेला झेल प्रेक्षणीय होता.

विराट फलंदाजीला आल्यावर प्रेक्षकांनी गलका केला. तीन डावांत अपयशी ठरलेला विराट मोठी खेळी करायला उत्सुक होता. 15 धावा करून जम बसवू बघणाऱ्या विराटला टप्पा पडल्यावर खाली राहिलेल्या हेझलवूडच्या चेंडूने चकविले. पंचांनी पायचीत दिल्याचा निर्णय विराटला पसंत नव्हता. चेंडू पॅडवर आदळण्यास अगोदर बॅटला लागल्याचा त्याचा अंदाज होता. तिसऱ्या पंचांनी बराच काळ रिप्ले बघून निर्णय योग्य असल्याचे जाहीर केले. त्यानंतर विराट वैतागून परतला.

पाचव्या क्रमांकावर जडेजाला पाठवायचा आश्‍चर्यकारक निर्णय जास्त काम करून गेला नाही. हेझलवूडच्या चेंडूने जडेजाच्या स्टंप लगेचच हलविल्या. चार धावांवर जीवदान लागलेला पुजारा एव्हाना स्थिरावला होता. अपयशाच्या दडपणाखाली खचलेला रहाणे मैदानात उतरला तेव्हा कोणालाच खात्री वाटत नव्हती. घर बांधायला एक एक वीट रचत जावे तसे पुजारा-रहाणे जोडीने भागीदारी रचणे चालू केले. दोघांनी एकेरी धावांवर भर दिला ज्याने स्ट्राइक बदलत राहिला. जम बसल्यावर रहाणेने सहजी फटके मारत चौकार जमा केले. त्यातील ओकीफला क्रीझचा वापर करत मागे रेलत सरळ बॅटने मिडविकेटला मारलेला चौकार लक्षणीय होता.

चहापानानंतर एकही विकेट गेली नाही. तिथेच सामन्याचा तोल साधला गेला. भारताचे अजून सहा फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत.

खेळपट्टी थोडी संथ झाली - हेझलवूड
पहिल्या दोन दिवसांच्या तुलनेत खेळपट्टी थोडी संथ झाल्यासारखी वाटली. आमचा चेंडू स्विंग कमी होत होता, तसेच रिव्हर्स करणेही जमत नव्हते. मी केवळ गोलंदाजीचा कोन बदलून तीन बळी मिळवले. चहापानापर्यंत आमचा सामन्यावर वरचष्मा होता; पण शेवटच्या सत्रात पुजारा-रहाणेने फारच सुंदर फलंदाजी केली. दोघांनी सतत स्ट्राइक बदलत ठेवला, तसेच खराब चेंडूंवर धावा जमा केल्या. मला वाटते हा सामना योग्य समतोल अवस्थेत आहे. चौथ्या दिवशी आम्हाला एक तर चालू भागीदारी तोडावी लागेल, तसेच उरलेल्या फलंदाजांना लवकरात लवकर बाद करावे लागेल.

बॅडपॅच कोणाला चुकलेला नाही - संजय बांगर
फलंदाज कितीही मोठा असला किंवा तुफान फॉर्ममध्ये असला तरी कधी ना कधी तो काळ संपतो. बॅडपॅच कोणाही फलंदाजाला चुकलेला नाही. जेव्हा धावांचा झरा काही काळाकरिता आटतो तेव्हा फलंदाजाने जास्त नकारात्मक विचार करत बसायचा नसतो. अजिंक्‍य रहाणेचे उदाहरण घ्या. अजिंक्‍यने परदेशात फार सुंदर फलंदाजी केली. न्यूझीलंडसमोर इंदोर कसोटी सामन्यात मोठी खेळी केली. बांगलादेशाविरुद्ध चांगली फलंदाजी केली. पण त्याच्या काही खराब खेळ्यांनंतर लगेच बोलणे चालू कसे होते मला समजत नाही. रहाणेने आज अत्यंत मोक्‍याच्या क्षणी केलेली भक्कम फलंदाजी त्याची खरी गुणवत्ता दाखवते. पुजाराने रहाणेला साथीला घेऊन रचलेल्या भागीदारीने सामन्यात जान आली आहे. जर अजून दोन सत्र आम्ही फलंदाजी करू शकलो, तर दडपणाचा सगळा भार ऑस्ट्रेलियन संघाकडे जाणार आहे.

दृष्टिक्षेपात
- पुजारा-रहाणेची 93 धावांची नाबाद भागिदारी भारतासाठी मालिकेतील आतापर्यंतची सर्वोत्तम व तिसरीच अर्धशतकी.
- तिसऱ्या सत्रात एकही विकेट न गमाविता भारताच्या 91 धावा. भारताने मालिकेत एखाद्या सत्रात प्रथमच एकही विकेट गमावली नाही.
- दुसऱ्या डावात लायनला 27 षटकांत एकही विकेट नाही. पहिल्या डावात त्याच्या 50 धावांत आठ विकेट; पण भारतीय फलंदाजांची त्याच्याविरुद्ध नियंत्रणाची टक्केवारी दोन्ही डावांत 77.61 अशी सारखीच.
- पुजाराचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध यापूर्वी आठ डावांत एकही अर्धशतक नाही. 2014-15 मध्ये ऍडलेडमधील 73 धावांच्या खेळीनंतर प्रथमच अर्धशतक. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दहा डावांत त्याची पाच अर्धशतके होती.
- 2016-17 च्या मोसमात पुजाराच्या कसोटीत हजार धावा पूर्ण. विराटनंतर दुसरा भारतीय फलंदाज.
- 63 धावांत सहा विकेट जडेजाची दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी. सर्वोत्तम याच मोसमात इंग्लंडविरुद्ध चेन्नईत 48 धावांत सात विकेट.
- विराटची मालिकेतील आतापर्यंतची 10 ही सर्वांत खराब सरासरी
 
धावफलक
भारत - पहिला डाव - 189
ऑस्ट्रेलिया - पहिला डाव - वॉर्नर त्रि. गो. अश्‍विन 33, रेनशॉ यष्टिचीत साहा गो. जडेजा 60, स्मिथ झे. साहा गो. जडेजा 8, शॉन मार्श झे. नायर गो. यादव 66, हॅंडसकॉम्ब झे. अश्‍विन गो. जडेजा 16, मिचेल मार्श पायचीत गो. ईशांत 0, वेड पायचीत गो. जडेजा 40-113 चेंडू, 4 चौकार, स्टार्क झे. जडेजा गो. अश्‍विन 26-52 चेंडू, 2 चौकार, ओकीफ नाबाद 4, लायन पायचीत गो. जडेजा 0, हेझलवूड झे. राहुल गो. जडेजा 1, अवांतर 22, एकूण 122.4 षटकांत सर्वबाद 276
बाद क्रम - 1-52, 2-82, 3-134, 4-160, 5-163, 6-220, 7-269, 8-274, 9-274
गोलंदाजी - ईशांत 27-8-48-1, उमेश 24-7-57-1, अश्‍विन 49-13-84-2, जडेजा 21.4-1-63-6, नायर 1-0-7-0
भारत - दुसरा डाव - राहुल झे. स्मिथ गो. ओकीफ 51-85 चेंडू, 4 चौकार, मुकुंद त्रि. गो. हेझलवूड 16-32 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, पुजारा खेळत आहे 79-173 चेंडू, 6 चौकार, विराट पायचीत गो. हेझलवूड 15-25 चेंडू, 1 चौकार, जडेजा त्रि. गो. हेझलवूड 2, रहाणे खेळत आहे 40-105 चेंडू, 3 चौकार, अवांतर 10, एकूण 72 षटकांत 4 बाद 231
बाद क्रम - 1-39, 2-84, 3-112, 4-120
गोलंदाजी स्टार्क 10-0-45-0, हेझलवूड 16-0-57-3, लायन 27-2-69-0, ओकीफ 16-3-28-1, मिचेल मार्श 3-0-4-0

 

 

Web Title: india-austrolia test cricket match