नाणेफेकीला पर्यायाने पहिल्या डावाला महत्त्व

सुनंदन लेले
गुरुवार, 16 मार्च 2017

आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचे दंद्व रंगणार
रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट दंद्वाला एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर उद्या शुक्रवारपासून पुन्हा सुरवात होईल. या दोन संघांमधील तिसरा कसोटी क्रिकेट सामना येथे उद्या सुरू होईल, तेव्हा रांची कसोटी केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करेल.

आठवड्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचे दंद्व रंगणार
रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट दंद्वाला एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर उद्या शुक्रवारपासून पुन्हा सुरवात होईल. या दोन संघांमधील तिसरा कसोटी क्रिकेट सामना येथे उद्या सुरू होईल, तेव्हा रांची कसोटी केंद्र म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करेल.

भारतामधील हे 26वे केंद्र ठरेल. दोन कसोटी सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत असून, तिसरा सामना सुरू होण्यापूर्वी संघ नियोजनापेक्षा खेळपट्टीच्या स्वरूपाचीच चर्चा अधिक आहे. खेळपट्टीचे सध्याचे स्वरूप लक्षात घेता नाणेफेकीचा कौल आणि पर्यायाने पहिल्या डावातील खेळ महत्त्वपूर्ण ठरणार असेच दिसून येत आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यातील "डीआरएस' वादाची पार्श्‍वभूमी या सामन्याला असेल. एकूण दोन्ही संघांतील खेळाडू आक्रमक राहणार यात शंका नाही. अर्थात, ही आक्रमकता त्यांच्या खेळात दिसणार की वर्तनात हा उत्सुकतेचा भाग राहील. कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही कर्णधारांची भूमिका संयमी दिसून आली असली, तरी तोच संयम मैदानावर राहील, याची शक्‍यता कमीच आहे.

खेळपट्टी कशी राहणार
मालिका बरोबरीत असल्याने दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरतील यात शंका नाही. अर्थात, खेळाडूंच्या कौशल्याबरोबर खेळपट्टीचा गुणधर्म मध्यवर्ती आकर्षण राहील. येथील माती काळ्या रंगाची असून, ती एका बाजूने चांगली दिसत असली, तरी दुसऱ्या बाजूला चांगले पॅचेस दिसून आले. त्यामुळे खेळपट्टी संथ राहणार यात शंका नाही. किमान पहिले दोन दिवस फलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकेल. मात्र, तिसऱ्या दिवसापासूनच येथे चेंडू वळायला लागतील असाच अंदाज सामन्याच्या पूर्वसंध्येला बांधला जात आहे. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेऊनच दोन्ही संघ व्यवस्थापन संघबांधणी करतील यात शंका नाही. खेळपट्टीच्या गुणधर्माचा कुठला संघ फायदा उठवणार हे आताच सांगणे कठीण आहे.

संघातील बदल
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात एकच बदल अपेक्षित आहे. दुखापतीतून बऱ्या झालेल्या मुरली विजयला संघात स्थान मिळेल. त्यासाठी अभिनव मुकुंदला बाहेर बसावे लागेल. खेळपट्टीचे स्वरूप लक्षात घेता भारतीय संघात अन्य बदल अपेक्षित नाही. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघात दोन नवे चेहरे दिसतील. मार्श जखमी झाल्यावर त्यांनी अष्टपैलू मार्क्‌स स्टॉइनिस याला पाचारण केले. पुढे स्टार्क जखमी झाल्यावर त्यांनी पॅट कमिन्सला पाचारण केले. या दोघांपैकी कमिन्सचे पुनरागमन निश्‍चित मानले जात असले, तरी स्टॉइनिसला घेण्यापूर्वी संघ व्यवस्थापन ग्लेन मॅक्‍सवेलच्या पर्यायाचा विचार करेल. लायनच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे संघात पर्यायी ऑफस्पिनर असावा हा विचार मॅक्‍सवेलला संधी देताना केला जाईल.

तिसरा कसोटी सामना
स्थळ - रांची
थेट प्रक्षेपण - स्टार 1,3
सकाळी 9.30 पासून

Web Title: india austrolia test cricket match