जिद्दी स्मिथची चिवट फलंदाजी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

मॅक्‍सवेलची कर्णधाराला मोलाची साथ; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

मॅक्‍सवेलची कर्णधाराला मोलाची साथ; ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
रांची - पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट सामन्यासाठी रांची मैदानावरील खेळपट्टी भयानक दिसून येत असली, तरी पहिल्या दिवशी तरी तिने फलंदाजांचे लाड केले. नाणेफेकीचा कौल मिळविल्यावर त्याचा पूर्ण फायदा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी उचलला. त्यातही दुसऱ्या कसोटीत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने जिगरबाज खेळी करताना नाबाद शतक ठोकले. संधी मिळाल्यावर तिचे सोने करताना ग्लेन मॅक्‍सवेलने कर्णधाराला मोलाची साथ केली. या दोघांच्या प्रयत्नांनी पहिल्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाला 4 बाद 299 असे सुस्थितीत नेले.

खेळपट्टी काळ्या मातीची असल्यामुळे तिच्या स्वभावाचा अंदाज कोणालाच लागत नव्हता. खेळपट्टीच्या चेहऱ्याकडे बघून काही जणांनी हा सामनाही तीन दिवसांत संपण्याची भीती व्यक्त केली होती. नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करणार यात शंकाच नव्हती. स्मिथनेदेखील तेच केले. ऑस्ट्रेलियाने आज मार्श आणि स्टार्कच्या जागी ग्लेन मॅक्‍सवेल आणि पॅट कमिन्स यांना स्थान दिले.

भारताने अभिनव मुकुंदच्या जागी मुरली विजयला स्थान दिले.
खेळायला सुरवात झाल्यावर खेळपट्टी वेगळीच भासू लागली.

फलंदाजांना साथ मिळत असताना त्यावर चेंडू स्विंगही होत नव्हता आणि हवा तेवढा वळतही नव्हता. डेव्हिड वॉर्नर आणि मॅट रेनशॉ यांनी झटपट अर्धशतकी सलामी दिली. वॉर्नरचे मनसुबे स्पष्ट दिसत असतानाच तो जडेजाच्या फुलटॉस चेंडूवर त्याच्याकडेच झेल देऊन बाद झाला. स्थिरावलेला रेनशॉ देखील उमेश यादवच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद झाला. शॉन मार्शला मैदानावरील पंचांनी नाबाद ठरविल्याने भारताने "रेफरल' घेत तो बाद असल्याचा कौल मिळविला. पीटर हॅंड्‌सकोम्बही टिकू शकला नाही. चांगल्या सुरवातीनंतर ऑस्ट्रेलियाची 4 बाद 140 अशी स्थिती भारताला वर्चस्व राखण्यासाठी आव्हान देत होती.

जिद्दी स्मिथ
ऑस्ट्रेलियाची झालेली पडझड पाहून भारतीय गोलंदाज वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्न करत असतानाच खेळपट्टीवर दुसऱ्या बाजूने स्मिथ टेच लावून उभा होता. दुसऱ्या कसोटीतला वाद विसरून तो जिद्दीने उभा राहिला. त्याला रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरत होते. त्यातच आपल्या नैसर्गिक आक्रमकतेला मुरड घालून खेळणारा ग्लेन मॅक्‍सवेलदेखील भारताची डोकेदुखी ठरला. मॅक्‍सवेलने दाखवलेला समंजसपणा निर्णायक ठरला. बघता बघता ही जोडी जमून आली आणि भारतीय गोलंदाज हतबल झाले. त्यात खांदा दुखावल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीला मैदान सोडावे लागले. त्याचा परिणाम भारतीय खेळाडूंच्या देहबोलीतून जाणवत होता. नव्वदीत पोचल्यावर स्मिथ अतिसावध झाला. पण, त्याचवेळी मॅक्‍सवेलने आक्रमक खेळ केला. जडेजाला षटकार ठोकत त्याने अर्धशतक पूर्ण केले. स्मिथ 90 धावांवर असताना मॅक्‍सवेल 34 धावांवर होता. पण, स्मिथ जेव्हा 98 धावांवर आला तेव्हा मॅक्‍सवेल 73 धावांवर पोचला होता. स्मिथने नंतर एकेरी धाव घेत 19वे शतक साजरे केले.
पहिल्या दिवशी खेळपट्टीने फलंदाजीला साथ देत भारतीय संघाला निश्‍चित हादरा दिला आहे. आता दुसऱ्या दिवशीपासून खेळपट्टी कशी रंग भरते याची उत्सुकता कायम असेल.

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव
मॅट रेनशॉ झे. कोहली हो. यादव 44, डेव्हिड वॉर्नर झे. व गो. जडेजा 19, स्टिव्ह स्मिथ खेळत आहे 117 -244 चेंडू, 13 चौकार, शॉन मार्श झे. पुजारा 2, पीटर हॅंड्‌सकोम्ब पायचित गो. यादव 19, ग्लेन मॅक्‍सवेल खेळत आहे 82 -147 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, अवांतर 299 एकूण 90 षटकांत 4 बाद 299
गडी बाद क्रम - 1-50, 2-80, 3-89, 4-140
गोलंदाजी - ईशांत शर्मा 15-2-46-0, उमेश यादव 19-3-63-2, आर. अश्‍विन 23-2-78-1, रवींद्र जडेजा 30-3-80-1, मुरली विजय 3-0-17-0

दृष्टिक्षेपात पहिला दिवस
-कसोटी क्रिकेटमध्ये स्टिव्ह स्मिथच्या 53व्या कसोटीत 97व्या डावात पाच हजार धावा.
-झटपट पाच हजार धावा करणारा स्मिथ ऑस्ट्रेलियाचा तिसरा, तर एकूण सातवा फलंदाज. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून डॉन ब्रॅडमन 56, तर मॅथ्यू हेडनच्या 95 डावांत
-भारतात एका मालिकेत दोन शतके करणारा स्मिथ तिसरा पाहुणा कर्णधार. यापूर्वी क्‍लाईव्ह लॉईडची अशी कामगिरी (1974-75 आणि 1983-84) दोन वेळा, ऍलिस्टर कूक (2012-13)
-चालू मालिकेतील हे दुसरे शतक, दोन्ही शतके स्मिथचीच
-पाच हजार धावा करताना साठहून अधिक सरासरी राखणारा स्मिथ (60.73) चौथा फलंदाज. यापूर्वी ब्रॅडमन (97.94), वॅली हॅमंड (61.61), गॅरी सोबर्स (60.60), जॅक हॉब्ज (60.08). स्मिथने उद्या एकही धाव काढली नाही, तरी त्याची 60 ही सरासरी कायम राहणार
-कसोटीत पाच हजार धावा करणारा स्मिथ क्रिकेट विश्‍वातील 89वा फलंदाज, तर 20वा ऑस्ट्रेलियाचा
-पाच हजार धावांमध्ये स्मिथची 19 शतके. यापूर्वी ब्रॅडमन यांची 21, तर हेडन आणि गावसकर यांची प्रत्येकी 20. सचिन तेंडुलकर आणि निल हार्वे यांची 18 शतके
-पाचव्या विकेटसाठी स्मिथ-मॅक्‍सवेलची ऑस्ट्रेलियाकडून भारताविरुद्धची सर्वोच्च 153 धावांची भागीदारी. ही जोडी अजून नाबाद आहे. यापूर्वी मायकेल क्‍लार्क-मॅथ्यू वेड यांची 145 धावांची (2013)
Web Title: india austrolia test cricket match