भारतीय क्रिकेटपटूंनी उंचावली विजयाची 'गुढी'

वृत्तसंस्था
मंगळवार, 28 मार्च 2017

रवींद्र जडेजा आणि वृद्धिमान साहा यांनी जिगरबाज फलंदाजी करून भारताला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवून दिली.

धरमशाला - श्रीलंका, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि आता ऑस्ट्रेलिया असे सलग सातवी कसोटी मालिका जिंकत भारतीय क्रिकेटपटूंनी जगभरातील प्रमुख देशांना पराभूत करत विजयाची गुढी उंचावली. चौथा कसोटी सामना आठ गडी राखून जिंकत भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळविला.

आज (मंगळवार) सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. के. एल. राहुल आणि मुरली विजय यांनी ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करत असताना विजय 8 धावांवर कमिन्सचा शिकार ठरला. त्यापाठोपाठ पुजाराही धावबाद झाल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींना दडपण आले होते. मात्र, कर्णधार रहाणेने सुरवातीपासूनच आक्रमक खेळ करत लक्ष्याच्या दिशेने जोरदार आगेकूच केली. त्याला राहुलने उत्तम साथ दिली. अखेर या दोघांनी विजय साजरा करत भारताचा विजयरथ आणखी पुढे नेला. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय क्रिकेटपटूंनी केलेली कामगिरी उल्लेखनीय होती. के. एल. राहुलने अर्धशतक पूर्ण केले. तर, रहाणेने 38 धावा केल्या.

त्यापूर्वी तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाच्या जिगरबाज फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक चौथ्या कसोटीतील विजय तिसऱ्या दिवसअखेरीस भारताच्या दृष्टिक्षेपात आला होता. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले. बोर्डर-गावसकर करंडक पटकाविण्यासाठी भारतासमोर १०६ धावांचे माफक आव्हान मिळाले होते. हे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी गोलंदाजांनी वर्चस्व राखले. अर्थात, रवींद्र जडेजा आणि वृद्धिमान साहा यांनी जिगरबाज फलंदाजी करून भारताला पहिल्या डावात ३२ धावांची आघाडी मिळवून दिली. जडेजाने आक्रमक फलंदाजी करताना ६३ धावांची खेळी केली. भारताची आघाडी ३२ धावांवरच मर्यादित राहिली असली, तरी उसळी (बाऊन्स) मिळणाऱ्या खेळपट्टीवर ही आघाडीदेखील निर्णायक ठरली. याच आघाडीच्या दडपणाखाली ऑस्ट्रेलियाचे फलंदाज गडबडले आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या भोवतीचा फास घट्ट आवळला. त्यामुळेच त्यांचा दुसरा डाव ५३.५ षटकांत १३७ धावांत आटोपला.