भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जुलै 2017

संक्षिप्त धावफलक - 
भारत 50 षटकांत 4 बाद 251 (अजिंक्‍य रहाणे 72 -112 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, महेंद्रसिंह धोनी नाबाद 78 -79 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, केदार जाधव नाबाद 40 -26 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मिग्युएल कमिन्स 2-56) विजयी वि. विंडीज 38.1 षटकात सर्वबाद 158 (जेसन मोहंमद 40, कुलदीप यादव 3-41, आर. अश्विन 3-28, हार्दिक पांड्या 2-32)

अँटिगा - अजिंक्य रहाणे व महेंद्रसिंह धोनी यांच्या अर्धशतक खेळीनंतर कुलदीप यादव व आर. अश्विन यांच्या फिरकीने विंडीजच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात ओढल्याने भारताने विंडीजचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 93 धावांनी सहज पराभव केला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवनला तिसऱ्या षटकात बाद करून विंडीजच्या गोलंदाजांनी चांगली सुरवात केली. पण, गोलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर सलामीचा फलंदाज अजिंक्‍य रहाणेची संयमी फलंदाजी आणि नंतर महेंद्रसिंह धोनीने केदार जाधवसह केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने विंडीजसमोर 252 धावांचे आव्हान ठेवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित 50 षटकांत 4 बाद 251 धावा केल्या. 

प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर या वेळी भारताची सुरवात निराशाजनक झाली. शिखर धवन (2) आणि कर्णधार विराट कोहली (11) लवकर बाद झाले. त्यानंतर अजिंक्‍य रहाणे आणि युवराज सिंग यांनी भारताच्या डावाला स्थिरता दिली. मात्र, त्यांना धावांचा वेग वाढवण्यात अपयश आले. अशातच युवराजही (39) बाद झाला. तेव्हा भारताची धावसंख्या 26.2 षटकांत 3 बाद 100 अशी झाली. 
या वेळी एकत्र आलेल्या रहाणे आणि धोनी यांनी सावध फलंदाजी केली. अर्थात, त्यांनाही धावांचा वेग वाढवण्यात अपयश येत होते. विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजी अडखळली होती. उसळणारे चेंडू त्यांची परीक्षा बघत होते. धवन, कोहलीप्रमाणे अशाच एका चेंडूचा अंदाज न आलेला रहाणे बाद झाला. रहाणे बाद झाल्यावर मात्र धोनी आणि केदार जाधव यांनी डावाला खऱ्या अर्थाने वेग दिला. त्यांनी अखेरच्या 46 चेंडूंत 81 धावांची भर घातल्यामुळे भारताला अडीचशेची मजल मारता आली. 

या आव्हानासमोर विंडीजला सुरवातीलाच धक्के बसले. दुसऱ्या षटकात लुईसला उमेश यादवने बाद केले. त्यानंतर ठराविक अंतराने विंडीजचे फलंदाज बाद होत गोले. मोहंमदने 40 धावा करून भारतीय गोलंदाजांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. चायनामन गोलंदाज म्हणून ओळख असलेल्या कुलदीप यादवने विंडीजच्या तीन फलंदाजांना बाद केले. त्याला अश्विननेही तीन गडी बाद करून चांगली साथ दिली. त्यामुळे विंडीजचा डाव 158 धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक - 
भारत 50 षटकांत 4 बाद 251 (अजिंक्‍य रहाणे 72 -112 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, महेंद्रसिंह धोनी नाबाद 78 -79 चेंडू, 4 चौकार, 2 षटकार, केदार जाधव नाबाद 40 -26 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मिग्युएल कमिन्स 2-56) विजयी वि. विंडीज 38.1 षटकात सर्वबाद 158 (जेसन मोहंमद 40, कुलदीप यादव 3-41, आर. अश्विन 3-28, हार्दिक पांड्या 2-32)