भारताचा 178 धावांनी विजय; कसोटीत अव्वल

वृत्तसंस्था
सोमवार, 3 ऑक्टोबर 2016

कामगिरीत सातत्य राखणे, हेच आमचे लक्ष्य आहे. क्रमवारीत अव्वल स्थान मिळणे किंवा जाणे, हे आमच्या हाती नाही. पण कामगिरीतील सातत्य हे तर आम्ही निश्चित करू शकतो.
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार

कोलकाता: फलंदाजीसाठी प्रतिकूल खेळपट्टीवर 376 धावा करण्याचे अशक्‍यप्राय आव्हान न्यूझीलंडच्या फलंदाजांना पेलवले नाही आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही भारताने दणदणीत विजय मिळविला. या विजयासह भारताने कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांक मिळविला. चौथ्या डावात विजयासाठी 376 धावा करण्याचे लक्ष्य असताना न्यूझीलंडचा डाव 197 धावांतच संपुष्टात आला. मोक्‍याच्या क्षणी भक्कम फलंदाजी करणाऱ्या वृद्धिमान साहाला ‘सामनावीर‘ घोषित करण्यात आले. 

कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर 12 हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने भारताने न्यूझीलंडवरील सलग दुसऱ्या विजयासह मालिकेतही विजयी आघाडी घेतली. कर्णधार आणि संघातील सर्वोत्तम फलंदाज असलेल्या केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडने भारताला कडवी लढत देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण सूर गवसलेल्या भारतीय गोलंदाजांनी मायदेशातील वर्चस्व कायम राखत न्यूझीलंडला डोके वर काढण्याची संधी दिली नाही. 

कालच्या 8 बाद 227 या धावसंख्येवरून खेळ पुढे सुरू झाल्यानंतर भारताने आज 36 धावांची भर घातली. भुवनेश्‍वर कुमारने 23 धावा करत त्यात मोलाचा वाटा उचलला. दुसरीकडे, वृद्धिमान साहानेही अर्धशतक झळकाविले. भारताचा दुसरा डाव 263 धावांत संपुष्टात आला. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 376 धावांचे लक्ष्य होते आणि पराभव टाळण्यासाठी सहा सत्रे खेळून काढण्याचे खडतर आव्हानही होते. 

सूर हरपलेल्या मार्टिन गुप्टीलने दुसऱ्या डावात समाधानकारक धावा केल्या नसल्या, तरीही जवळपास तासभर किल्ला लढविला. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरवातीपासूनच सामना अनिर्णित राखण्याच्या दिशेनेच खेळ सुरू केल्याचे जाणवत होते. त्यामुळे मोठ्या धावसंख्येचे दडपण आणि तिखट मारा करणारे भारतीय गोलंदाज यामुळे न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरता आला नाही. याला अपवाद फक्त सलामीवीर टॉम लॅथमचा होता. त्याने सफाईदारपणे 74 धावा केल्या. जवळपास दीडशे चेंडू खेळत लॅथमने एक बाजू लावून धरली होती. ल्युक रॉंचीच्या 32 धावांचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना बाद करण्यात भारताला फारशी अडचण आली नाही. न्यूझीलंडचा दुसरा डाव 81 षटकांतच आटोपला. 

‘रिव्हर्स स्विंग‘चा अचूक वापर करत महंमद शमीने न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद केले. रवींद्र जडेजा आणि आर. आश्‍विनने नेहमीच्या सफाईदारपणे प्रत्येकी तीन गडी बाद करत विजयातील आपला वाटा उचलला. 

संक्षिप्त धावफलक : 
भारत : 
पहिला डाव : सर्वबाद 316 
न्यूझीलंड : पहिला डाव : सर्वबाद 204 
भारत : दुसरा डाव : सर्वबाद 263 
विजयासाठी लक्ष्य : 376 
न्यूझीलंड : दुसरा डाव : 81.1 षटकांत सर्वबाद 197 

टॉम लॅथम 74, मार्टिन गुप्टील 24, हेन्री निकोल्स 24, रॉस टेलर 4, ल्युक रॉंची 32, मिशेल सॅंटनर 9, बीजे वॉटलिंग 1, मॅट हेन्री 18, जीतन पटेल 2, नील वॅग्नर नाबाद 5, ट्रेंट बोल्ट 4 
अवांतर : 0 
गोलंदाजी : 
भुवनेश्‍वर कुमार 1-28, महंमद शमी 3-46, आर. आश्‍विन 3-82, रवींद्र जडेजा 3-41