पाकिस्तानचा 67 धावांत खुर्दा

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

दोन दिवसांपूर्वी बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवून विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करणाऱ्या भारतीयांनी पाकिस्तानचा डाव 43.4 षटकांत 67 धावांत गुंडाळून विजयाचे हे माफक लक्ष्य 22.3 षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले

कोलंबो - पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा अवघ्या 67 धावांत खुर्दा उडवून भारतीय क्रिकेट संघाने विश्‍वकरंडक क्रिकेट महिला पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. एकता बिश्‍तने अवघ्या आठ धावांत पाच फलंदाज बाद करून पाकिस्तानी फलंदाजीचे कंबरडे मोडले.

काही महिन्यांपूर्वी याच पाकिस्तानविरुद्ध न खेळल्यामुळे आयसीसीने भारतीय संघाचा धावफलक शून्य केला. त्यामुळे भारताला विश्‍वकरंडक पात्रता स्पर्धेत खेळावे लागले. आपली क्षमता दाखवणाऱ्या मिताली राजच्या संघाने या स्पर्धेत विजयाची मालिका कायम राखली.

दोन दिवसांपूर्वी बांगलादेशविरुद्ध शानदार विजय मिळवून विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्रता सिद्ध करणाऱ्या भारतीयांनी पाकिस्तानचा डाव 43.4 षटकांत 67 धावांत गुंडाळून विजयाचे हे माफक लक्ष्य 22.3 षटकांत तीन फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारताने "सुपर सिक्‍स'मधील आपले अव्वल स्थान भक्कम केले.
भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजी दिली. बिनबाद 17 अशा सुरवातीनंतर पाकिस्तानचा डाव कोलमडत गेला. त्यांच्याकडून आयेशा झफर (19), बिसमाह मारुफ (13) या दोघांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली. एकीकडे शिखा पांडे व एकता बिश्‍त एकापाठोपाठ एक यश मिळवत असताना तब्बल 24 अवांतर धावा देण्यात आल्या. यामध्ये 11 वाईड धावांचा समावेश आहे.

माफक आव्हानामुळे मिताली राजने इतर फलंदाजांना संधी दिली. मोना मेश्राम व देविका वैद्य अपयशी ठरल्या; परंतु दीप्ती शर्मा व हरमप्रीत कौर यांनी विजयासाठी फार काळ मैदानावर राहायला लागणार नाही याची काळजी घेतली.

पाकिस्तान संघावर सहज विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन! आता तर ही सवयच झाली आहे.
-वीरेंद्र सेहवाग.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान ः 43.4 षटकांत सर्व बाद 67 (आयेशा झफर 19, बिसमाह मारुफ 13, अवांतर 24; शिखा पांडे 7-2-9-2, एकता बिश्‍त 10-7-8-5) पराभूत वि. भारत ः 22.3 षटकांत 3 बाद 70 (दीप्ती शर्मा 29, हरमप्रीत कौर 24; सादिया युसूफ 8-1-19-2).

Web Title: India defeats Pakistan