रांचीत फुटणार मालिका विजयाचे फटाके?

पीटीआय
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

धोनीने आपला चौथा क्रमांक आता पक्का केला आहे. विराट आणि धोनी मैदानावर असेपर्यंत भारताला कोणतीच चिंता नसेल; परंतु त्यानंतरच्या फलंदाजांनाही विजयात हातभार लावावा लागेल.

रांची : विराट कोहलीने कसोटी मालिकेची मोहीम फत्ते केल्यानंतर आता मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका उद्याच जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. घरच्या मैदानावर त्याला ही संधी मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही कर्णधार चांगल्याच फॉर्मात आहेत. रांचीमध्ये आतापर्यंत झालेले दोन्ही एकदिवसीय सामने जिंकलेले असल्यामुळे इतिहासही भारताच्या बाजूने आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना उद्या (ता. 26) होत आहे. उद्याच्या सामन्याबरोबर मालिका जिंकली आणि त्यानंतर पाचवाही सामना जिंकला, तर भारताला एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थानी येण्याची संधी आहे.

मालिकेतील दुसरा सामना गमावलेला असला, तरी भारतीय संघाची भट्टी चांगली जमली आहे. अपवाद मात्र सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांचा. या दोघांनाही आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. रोहितला तीन सामन्यांत मिळून 42 धावाच करता आल्या आहेत, तर रहाणेला 33, 28 आणि पाच धावाच करता आल्या आहेत. ही आकडेवारी लक्षात घेता उद्या दोघांऐवजी एकाला वगळून मनदीप सिंग हा पर्यायही आजमावला जाऊ शकतो.

धोनीने आपला चौथा क्रमांक आता पक्का केला आहे. विराट आणि धोनी मैदानावर असेपर्यंत भारताला कोणतीच चिंता नसेल; परंतु त्यानंतरच्या फलंदाजांनाही विजयात हातभार लावावा लागेल.

कसोटी सामन्यातील यशस्वी गोलंदाजांना विश्रांती देऊनही या मालिकेत खेळणाऱ्या गोलंदाजांनी लक्षवेधक कामगिरी केली आहे. दिल्लीतील सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने शतक करूनही अंतिम टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव रोखून धरला होता. मोहालीतही अशीच कामगिरी केली होती. उमेश यादव, जसप्रीत बुमरा आणि हार्दिक पंड्या हे वेगवान गोलंदाज, तर अमित मिश्रा आणि अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाज धोनीचा विश्‍वास सार्थ ठरवत आहेत; परंतु सरप्राईज पॅकेज केदार जाधव धोनीसाठी ट्रंप कार्ड ठरत आहे.

तिसरा सामना झालेल्या मोहालीतील खेळपट्टीपेक्षा रांचीची खेळपट्टी वेगळी आहे. गवत कमी असल्यामुळे फिरकीस साथ मिळण्याची शक्‍यता आहे; मात्र रात्री दव पडण्याची शक्‍यता असल्यास प्रथम गोलंदाजीस प्राधान्य दिले जाण्याची शक्‍यता आहे.

न्यूझीलंडसाठी कर्णधार विल्यम्सन आणि टॉम लॅथम यांचा अपवाद वगळता त्यांचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरत आहेत. मार्टिन गुप्टील, रॉस टेलर, कॉरे अँडरसन आणि ल्यूक रॉंची यांनी अपेक्षाभंग केला आहे. उद्याच्या सामन्यातही त्यांचे अपयश कायम राहिले, तर भारताला वर्चस्व मिळवणे कठीण जाणार नाही.