क्रिकेट: 'वन-डे' क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानी

वृत्तसंस्था
सोमवार, 1 मे 2017

एकदिवसीय क्रमवारीतील पहिले आठ संघ वगळता इतर दहा संघांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. ही फेरी पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. या दहा संघांपैकी पहिले दोन संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 30 सप्टेंबरच्या आधी वेस्ट इंडीज अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी मात्र वेस्ट इंडीजचा संघ पात्र ठरू शकलेला नाही.

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी क्रिकेट विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्याच्या वेस्ट इंडीजच्या आशांना आणखी धक्का बसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील ताज्या क्रमवारीत वेस्ट इंडीज नवव्या क्रमांकावर आहे आणि आठव्या क्रमांकावरील पाकिस्तानपेक्षा त्यांचे नऊ गुण कमी आहेत. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत क्रमवारीतील पहिल्या आठ संघच 2019 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र असतील. या क्रमवारीत सध्या भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेसाठीच्या पात्रतेसाठी 'आयसीसी'ने 30 सप्टेंबर ही 'डेडलाईन' निश्‍चित केली आहे. त्यामुळे आता पुढील चार महिन्यांत नियोजित एकदिवसीय सामन्यांमध्ये शक्‍य तितके जास्त गुण मिळविण्याचा प्रयत्न वेस्ट इंडीजला करावे लागतील. अन्यथा इंग्लंडमधील स्पर्धेत स्थान मिळविण्यासाठी त्यांना पात्रता स्पर्धेत खेळावे लागू शकते. 

दुसरीकडे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकदिवसीय क्रमवारीतील अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले आहे. याआधी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला आता चौथ्या स्थानावर जावे लागले आहे; तर चौथ्या स्थानावरील भारताला तिसरा क्रमांक मिळाला आहे. 

एकदिवसीय क्रमवारीतील पहिले आठ संघ वगळता इतर दहा संघांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. ही फेरी पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणार आहे. या दहा संघांपैकी पहिले दोन संघ विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरतील. 30 सप्टेंबरच्या आधी वेस्ट इंडीज अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी मात्र वेस्ट इंडीजचा संघ पात्र ठरू शकलेला नाही. 

एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारी :

 1. दक्षिण आफ्रिका (123 गुण)
 2. ऑस्ट्रेलिया (118) 
 3. भारत (117) 
 4. न्यूझीलंड (115) 
 5. इंग्लंड (109) 
 6. श्रीलंका (93) 
 7. बांगलादेश (91) 
 8. पाकिस्तान (88) 
 9. वेस्ट इंडीज (79) 
 10. अफगाणिस्तान (52) 

कसोटी क्रिकेटमधील क्रमवारी : 

 1. भारत (122 गुण) 
 2. दक्षिण आफ्रिका (109) 
 3. ऑस्ट्रेलिया (108) 
 4. इंग्लंड (101) 
 5. पाकिस्तान (97) 
 6. न्यूझीलंड (96) 
 7. श्रीलंका (90) 
 8. वेस्ट इंडीज (69) 
 9. बांगलादेश (66) 
 10. झिंबाब्वे (5) 

ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील क्रमवारी : 

 1. न्यूझीलंड (127) 
 2. भारत (124) 
 3. दक्षिण आफ्रिका (117) 
 4. पाकिस्तान (116) 
 5. इंग्लंड (114) 
 6. वेस्ट इंडीज (112) 
 7. ऑस्ट्रेलिया (110) 
 8. श्रीलंका (99) 
 9. अफगाणिस्तान (84) 
 10. बांगलादेश (74)