भारत 213/4; 126 धावांची आघाडी

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

फिरकीस साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर धावा जमविणे अत्यंत आव्हानात्मक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुजारा व रहाणे यांच्यात झालेली 93 धावांची भागीदारी सामन्यात निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे

बंगळूर - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेरीस भारताने दुसऱ्या डावात 4 बळी गमावित 213 धावा करण्यात यश मिळविले. याबरोबरच, भारताकडे एकूण 126 धावांची आघाडी झाली असून येत्या दोन दिवसांत हा सामना आता आणखी रंगतदार होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

सलामीवीर के एल राहुल याच्या संयमी अर्धशतकानंतर (नाबाद 51 धावा - 85 चेंडू) चेतेश्‍वर पुजारा (79 धावा - 173 चेंडू) व अजिंक्‍य रहाणे (नाबाद 40 धावा - 105 चेंडू) यांच्या अखंडित भागीदारीमुळे भारतास तिसऱ्या दिवस अखेरपर्यंत समाधानकारक मजल मारण्यात यश आले. मात्र आता 126 धावांच्या या आघाडीचे किती धावांच्या अंतिम आव्हानामध्ये रुपांतर होते, हे पाहणे औत्सुक्‍याचा विषय असेल.

भारतीय कर्णधार विराट कोहली याला आज पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. कोहली हा अवघ्या 15 धावांवर पायचीत झाला. जलदगती गोलंदाज जोश हेझलवूड याने कोहलीस बाद केले. कोहलीसहच सलामीवीर अभिनव मुकुंद (16 धावा - 32 चेंडू) व रवींद्र जडेजा (2 धावा 12 चेंडू) यांनाही बाद करण्यात हेझलवूडने यश मिळविले.

फिरकीस साथ देणाऱ्या या खेळपट्टीवर धावा जमविणे अत्यंत आव्हानात्मक असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पुजारा व रहाणे यांच्यात झालेली 93 धावांची भागीदारी सामन्यात निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. या जोडीने संयमी खेळ करत ओकीफ व लिऑन या ऑस्ट्रेलियाच्या फिरकी दुकलीस भारताचे आणखी नुकसान करु दिले नाही. सामन्याचे आणखी दोन दिवस बाकी असताना भारताचे अद्यापी सहा फलंदाज खेळावयाचे आहेत. या पार्श्‍वभूमीवर, उद्या (मंगळवार) दिवसाचा पहिला तास अत्यंत महत्त्वाचा असेल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील पहिला सामना भारताने गमाविला आहे. यामुळे हा सामना जिंकण्याचे दडपण भारतावर असल्याचे मानले जात आहे.