'वनडे'मध्येही आक्रमक खेळणार : रहाणे

पीटीआय
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

मैदानावर असताना प्रत्येक क्षणी खेळातील बदलत्या परिस्थितीबाबत सतर्क राहणे आवश्‍यक आहे. कर्णधाराच्या डोक्‍यात सतत असंख्य विचार सुरू असतात. त्यामुळे उपकर्णधार म्हणून सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच, आपण काय योगदान देऊ शकतो, कुठली योजना राबवू शकतो, याविषयीही मुद्दे मांडू शकतो.
- अजिंक्‍य रहाणे, भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार

धरमशाला: 'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील यशामागे 'संघाचे आक्रमक धोरण' हे महत्त्वाचे कारण होते. आता एकदिवसीय मालिकेमध्येही आम्ही हेच धोरण कायम ठेवत आक्रमक खेळ करणार आहोत,' असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने काल (शुक्रवार) केले. भारत आणि न्यूझीलंडमधील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेस उद्यापासून (रविवार) सुरवात होत आहे.

नुकत्याच संपलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने न्यूझीलंडवर 3-0 असा दणदणीत विजय मिळविला. या विजयासह कसोटी क्रमवारीत भारताने अव्वल क्रमांकही पटकाविला. या विजयाचे श्रेय रहाणेने संघाच्या आक्रमकतेला दिले.

रहाणे म्हणाला, "न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेत योजनाबद्ध आणि शिस्तबद्ध खेळ महत्त्वाचा असेल. कसोटी मालिकेत आम्ही प्रत्येक सत्रात आक्रमक खेळ केला. त्यामुळे आता एकदिवसीय मालिकेतही आम्ही असाच खेळ करू. प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदीवर किंवा उणीवांवर लक्ष केंद्रीत करण्यापेक्षा आम्ही स्वत:च्या ताकदीनुसार खेळ करणार आहोत.''

या मालिकेसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आर. आश्‍विन, महंमद शमी, रवींद्र जडेजा यांना विश्रांती दिली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत जयंत यादव, अक्षर पटेल, धवल कुलकर्णी, मनदीपसिंग, मनीष पांडे या तरुण खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.