भारत-पाकिस्तान रविवारी महामुकाबला 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 जून 2017

चॅम्पियन्स करंडक : बांगलादेशचा उडवला धुव्वा 

बर्मिंगहॅम : क्रिकेटविश्‍वाला ज्या अंतिम सामन्याची उत्सुकता लागून राहिली होती त्याच भारत-पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचा महामुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने इंग्लंडला धूळ चारून अंतिम फेरी गाठली होती. आज भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवून तेवढ्याच दिमखात अंतिम फेरीत प्रवेश केला. केदार जाधवचा "गोल्डन आर्म' आणि रोहित शर्माचे शानदार नाबाद शतक (123) हे भारताच्या विजयाचे प्रमुख पैलू ठरले. 

चॅम्पियन्स करंडक : बांगलादेशचा उडवला धुव्वा 

बर्मिंगहॅम : क्रिकेटविश्‍वाला ज्या अंतिम सामन्याची उत्सुकता लागून राहिली होती त्याच भारत-पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचा महामुकाबला रंगणार आहे. पाकिस्तानने इंग्लंडला धूळ चारून अंतिम फेरी गाठली होती. आज भारताने बांगलादेशचा धुव्वा उडवून तेवढ्याच दिमखात अंतिम फेरीत प्रवेश केला. केदार जाधवचा "गोल्डन आर्म' आणि रोहित शर्माचे शानदार नाबाद शतक (123) हे भारताच्या विजयाचे प्रमुख पैलू ठरले. 

फलंदाजीस पोषक असलेल्या खेळपट्टीवर भारताने बांगलादेशला 264 धावांत रोखले. या वेळी केदार जाधवने डावाच्या मध्यावर मिळवलेले दोन बळी निर्णायक ठरले होते. हे आव्हान भक्कम फलंदाजी असलेल्या भारताने 40.1 षटकांतच पार केले. त्याचवेळी पाकिस्तानलाही इशारा दिला. रोहित शर्मा-शिखर धवनची 87 धावांची सलामी आणि त्यानंतर रोहित-विराटची नाबाद 178 धावांची भागीदारी बांगलादेशला प्रतिकाराचीही संधी न देणारी ठरली. 

2011, 2015 मधील 50-50 षटकांचा विश्‍वकरंडक आणि दीड वर्षांपूर्वी झालेला ट्‌वेन्टी-20चा विश्‍वकरंडक या तिन्ही मोठ्या स्पर्धांत भारताकडून पराभव झालेल्या बांगलादेशने आजच्या सामन्यासाठी पडद्याआडून आव्हानाची भाषा सुरू केली होती. प्रत्यक्षात मैदानावर मात्र त्यांना सपशेल शरणागती स्वीकारावी लागली. 265 धावांचे आव्हान सोपेही नव्हते; परंतु गेल्या चॅम्पियन्स स्पर्धेपासून फॉर्मात असलेल्या रोहित-धवन सलामीच्या जोडीच्या सहा धावांच्या सरासरीने डावाची सुरुवात करून बांगलादेशच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. धवन आपल्या खेळीला अर्धशतकाचा मुलामा देण्यापूर्वीच बाद झाला; परंतु रोहितने आपल्या खेळीवर शतकाची मोहोर उमटवली. विराटनेही आपल्या बॅटचे पाणी दाखवले. जिंकण्यासाठी धावाच अधिक नसल्यामुळे शतक करण्याची त्याला संधी मिळाली नाही. 78 चेंडूत तो 96 धावांवर नाबाद राहिला. 

तत्पूर्वी, अधूनमधून होणारी क्षेत्ररक्षणातील ढिलाई, नोबॉल, वाईड बॉल, अश्‍विनने सोडलेला झेल, पाच दंड धावा असा स्वैरपणा भारतीयांना भोवला. बांगलादेशच्या 264 धावांत भारताने 23 अवांतर धावा दिल्या. अशा सर्व घटना विरोधात जात असताना केदार जाधवने महत्त्वाच्या क्षणी दोन विकेट मिळवून दिलेला दिलासा कोहलीच्या चेहऱ्यावर समाधान देणारा ठरला. 

भुवनेश्‍वर कुमारने बांगलादेशची 2 बाद 31 अशी अवस्था केली. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये पाचऐवजी चारच क्षेत्ररक्षक 30 यार्डात ठेवल्यामुळे पंड्याचा चेंडू नोबॉल ठरवण्यात आला. त्यानंतर ज्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली तो चेंडू नोबॉल टाकला. त्याच्या या षटकात 15 धावा वसूल करून तमिम इक्‍बाल आणि मुशफिकर रहिम यांनी गिअर बदलले आणि बघता बघता तिसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. या वेळी बांगलादेशला त्रिशतकी धावा खुणावत होत्या. हतबल झालेल्या कोहलीने केदारकडे आशेने पाहिले आणि त्याने तमिम आणि मुशफिकर यांना बाद केले. त्यामध्ये जडेजाने शकिब अल्‌ हसनला मागारी धाडले. बांगलादेशचा निम्मा संघ 179 धावांत बाद झाला होता. 

महम्मदुल्ला आणि मोसादेक हुसैन यांनी डाव सावरला. महम्मदुल्ला चार धावांवर असताना त्याचा झेल स्वीपर कव्हरमध्ये अश्‍विनने सोडला. या दरम्यान धावचीत करताना धोनीने ग्लोज जमिनीवर टाकला होता; पण थ्रो केलेला चेंडू ग्लोजला लागल्यामुळे बांगलादेशला पाच दंड धावा मिळाल्या; पण बुमराहने या दोन्ही फलंदाजांना काही वेळानंतर बाद करून दिलासा दिला. बांगलादेशला अडीचशे धावांत रोखण्याची संधी होती; पण मुशरफी मुर्तझाने दाणपट्टा फिरवत 25 चेंडूत नाबाद 30 धावा फटकावल्या. त्यामुळे बांगलादेशला 264 धावांपर्यंत मजल मारता आली. 

संक्षिप्त धावफलक : बांगलादेश : 50 षटकांत 7 बाद 264 (तमिम इक्‍बाल 70- 82 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, मुशफिक रहिम 61- 85 चेंडू, 4 चौकार, महम्मुदुल्ला 21, मुशरफी मुर्तझा नाबाद 30- 25 चेंडू, 5 चौकार, भुवनेश्‍वर कुमार 10-1-53-2, बुमरा 10-1-39-2, केदार जाधव 6-0-22-2) पराभूत वि. भारत (रोहित शर्मा नाबाद 123 -129 चेंडू, 15 चौकार, 1 षटकार, शिखर धवन 46 -34 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, विराट कोहली नाबाद 96 -78 चेंडू, 13 चौकार)