कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याची दाट शक्‍यता

सुनंदन लेले
शुक्रवार, 24 मार्च 2017

धरमशाला हे पर्यटनाचेही केंद्र असल्याने दिल्ली, चंदिगड भागातून बरेच क्रिकेटप्रेमी शहरात दाखल होत आहेत. दोन दिवस कुटुंबाबरोबर पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर क्रिकेटप्रेमी मैदानाकडे धाव घेतील. शनिवार-रविवार सुट्टीचा फायदा घेऊन अंदाजे 15 हजार प्रेक्षक मैदानावर येतील, असा विश्‍वास संयोजकांनी व्यक्त केला.

धरमशाला : धरमशालामधील थंडगार हवा क्रिकेटच्या बहुचर्चित लढतीमुळे गरम झाली आहे. पुण्यातील विजयानंतर बॉर्डर-गावसकर करंडक ऑस्ट्रेलियाकडे निघाला होता. बंगळूरचा कसोटी सामना जिंकून करंडक जणू सिंगापूरहून पुन्हा भारतात खेचला गेला. या क्षणी मालिका 1-1 अशा बरोबरीत असल्याने बॉर्डर-गावसकर करंडक एका जागी स्थिर उभा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू विश्रांतीनंतर सराव करून अंतिम लढतीसाठी सज्ज झाले आहेत. पण रांचीतील सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहली अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे धरमशाला कसोटीत विराट खेळण्याची शक्‍यता फारच कमी आहे. 

या मालिकेला सुरवात होण्यापूर्वी 'भारतीय संघ आरामात जिंकेल' असे अनेक जाणकारांना वाटत होते. पुण्यातील पहिल्या सामन्यात नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला, तेव्हा हाती आलेली संधी कांगारूंनी घट्ट धरून ठेवली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बंगळूरमध्ये भारताचा पहिला डाव 200 च्या आत संपल्यावर वाटले, की ऑस्ट्रेलियाच मालिका जिंकणार! पण झाले भलतेच.. या सामन्यात भारतीय संघाने जोरदार पुनरागमन करत विजय मिळविला आणि मालिकेत बरोबरी साधली. रांचीत ऑस्ट्रेलियाला सामना वाचवायला धडपड करावी लागली. या पार्श्‍वभूमीवर धरमशाला कसोटीला महत्त्व आले आहे. विशेष म्हणजे, या मैदानावर प्रथमच कसोटी सामना होणार आहे.

दोन दिवस विश्रांती आणि दोन दिवस सराव करून दोन्ही संघांतील खेळाडू आता मैदानावरील लढाईसाठी सज्ज झाले आहेत. धरमशालाची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना उसळी देऊन मदत करते, असा इतिहास आहे. तरीही खेळपट्टीवरील गवत पूर्णपणे काढले गेल्याने वेगवान गोलंदाजांना अपेक्षित साथ मिळेल, असे वाटत नाही. 'तीन वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळावे की काय,' अशी चर्चा ऑस्ट्रेलिया खूप करेल आणि शेवटी दोन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरेल, असे वाटते. बाहेरील मैदानात रेतीचा भाग जास्त असल्याने खेळाडूंना दमणूक जाणवेल, असेही बोलले जात आहे. 

खांद्याच्या दुखापतीतून कोहली पूर्णपणे सावरला नाही आणि त्याने स्वत:च विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला, तरच भारतीय संघात बदल होण्याची शक्‍यता असेल. कोहलीने विश्रांती घेतली, तर संघाचे नेतृत्व अजिंक्‍य रहाणे करेल आणि श्रेयस अय्यरचे कसोटी पदार्पण होईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात श्रेयस अय्यरने घणाघाती फटकेबाजी करत द्विशतक झळकाविले होते. 

भारतीय संघातील काही गोलंदाजांनी चालू क्रिकेट मोसमात पाच हजारांहून अधिक चेंडू गोलंदाजी केली आहे. पुजारासारख्या फलंदाजाने रांचीतील सामन्यात दोन दिवस फलंदाजी केली. या सर्व थकावटीतून भारतीय खेळाडू सावरले असल्याची ग्वाही संघ व्यवस्थापनातील सपोर्ट स्टाफ देत आहे. धरमशाला हे पर्यटनाचेही केंद्र असल्याने दिल्ली, चंदिगड भागातून बरेच क्रिकेटप्रेमी शहरात दाखल होत आहेत. दोन दिवस कुटुंबाबरोबर पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर क्रिकेटप्रेमी मैदानाकडे धाव घेतील. शनिवार-रविवार सुट्टीचा फायदा घेऊन अंदाजे 15 हजार प्रेक्षक मैदानावर येतील, असा विश्‍वास संयोजकांनी व्यक्त केला.