युवराजची खेळी ठरली 'गेम चेंजर' : कोहली

वृत्तसंस्था
सोमवार, 5 जून 2017

युवराज त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करतो, तेव्हा संघातील इतर फलंदाजांना थोडी मोकळीक मिळते. बहुतांश वेळा युवराज मनसोक्त फलंदाजी करतो आणि संघाला विजयाच्या दाराशी नेऊन ठेवतो. म्हणूनच त्याला संघात घेण्याचा आमचा आग्रह असतो.
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार

एजबस्टन : 'युवराजसिंगच्या धडाकेबाज खेळीमुळेच पाकिस्तानवर दडपण आणण्यात आम्हाला यश आले आणि त्यानंतर सांघिक कामगिरीच्या जोरावर परिपूर्ण विजय मिळविता आला', अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने युवराजचे कौतुक केले. चॅंपियन्स करंडक स्पर्धेत भारताने काल कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 124 धावांनी दणदणीत विजय मिळवून विजयी सलामी दिली.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भक्कम सलामी दिल्यानंतर विराट कोहली आणि युवराजसिंग यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व गाजविले. युवराजने 32 चेंडूंत 53 धावा चोपल्या. या खेळीचे कोहलीने तोंड भरून कौतुक केले.

कोहली म्हणाला, "युवराजच्या खेळीने सामन्याची बाजीच पलटली. त्याने मुक्तपणे फटकेबाजी केली. त्याच्या खेळीमुळे आमच्यातही फटकेबाजी करण्याचा विश्‍वास निर्माण झाला.'' विशेष म्हणजे, युवराज 2007 नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये खेळत होता. त्यातही, तापामुळे तो सराव सामन्यात सहभागी झाला नव्हता. तरीही त्याने प्रत्यक्ष सामन्यात कमाल कामगिरी केली.

युवराज त्याच्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करतो, तेव्हा संघातील इतर फलंदाजांना थोडी मोकळीक मिळते. बहुतांश वेळा युवराज मनसोक्त फलंदाजी करतो आणि संघाला विजयाच्या दाराशी नेऊन ठेवतो. म्हणूनच त्याला संघात घेण्याचा आमचा आग्रह असतो.
- विराट कोहली, भारतीय संघाचा कर्णधार