भारतीयांच्या अस्तित्वाची कसोटी

सुनंदन लेले - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करावे लागेल. 

पुण्यातील पराभव हा केवळ अपघात होता, हे पटवून देण्यासाठी त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सुधारणा दाखवावी लागेल. अस्तित्वाची कसोटी लागलेल्या सामन्यात भारताच्या संघात एखाद दुसरा बदल अपेक्षित आहे. 

बंगळूर - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला उद्या शनिवारपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करावे लागेल. 

पुण्यातील पराभव हा केवळ अपघात होता, हे पटवून देण्यासाठी त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर सुधारणा दाखवावी लागेल. अस्तित्वाची कसोटी लागलेल्या सामन्यात भारताच्या संघात एखाद दुसरा बदल अपेक्षित आहे. 

ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर सपाटून मार खाणार या आशा पहिल्याच सामन्यात फोल ठरल्या. ऑस्ट्रेलियाने पहिलाच सामना मोठ्या फरकाने जिंकला. नाणेफेकीच्या कौलापासून सगळ्याच गोष्टी विराट सेनेच्या विरुद्ध गेल्या. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही आघाड्यांवर भारताचे खेळाडू अपयशी ठरले. याचा फायदा दुबईत पक्के ‘होमवर्क’ करून आलेल्या ऑस्ट्रेलियाने उचलला. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या सातत्याची आणि भारताच्या अस्तित्वाची खऱ्या अर्थाने कसोटी या सामन्यापासून 
लागेल.

कुंबळेंचा सल्ला
भारताचा संपूर्ण संघ आज सरावासाठी उपस्थित होता. फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या सरावाबरोबर गोलंदाजीचा सराव बारकाईने केला. पहिल्या कसोटीत फलंदाजांना चकवण्यात यशस्वी झाल्यानंतरही भारतीय फिरकी गोलंदाज त्यांना बाद करू शकत नव्हते. चेंडूचा टप्पा चुकत असल्यामुळे ते घडले. तीच चूक टाळण्यासाठी प्रशिक्षक कुंबळे यांनी गोलंदाजांना नेहमीच्या टप्प्यापेक्षा पुढे टप्पा ठेवण्याचा सल्ला देत होते. त्यानुसारच भारतीय गोलंदाजांनी सराव केला.
  
पाहुण्याचा तोच संघ
ऑस्ट्रेलियाने सामन्याच्या पूर्वसंध्येलाच पहिल्या कसोटीतील विजयी संघ कायम ठेवणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे कोरड्या वाटणाऱ्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया स्टिफन ओकीफकडून अपेक्षा बाळगून राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. पुण्यात अष्टपैलू मिशेल मार्शच्या गोलंदाजीचा फारसा वापर करता आला नाही. त्यामुळे किमान त्याला पारखण्यासाठी त्यानी संघात बदल केला नसावा. वॉर्नर, रेनशॉ, स्मिथ आणि शॉन मार्श यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार असेल. 

दृष्टिक्षेपात कसोटी
 भारताचा कांगारुंविरुद्ध बंगळूरला एकच विजय
 कांगारूंनी येथील तीन कसोटी जिंकल्या आहेत, तसेच दोन अनिर्णित
 स्मिथ पाच हजार कसोटी धावांपासून ११२ धावा दूर
 थेट प्रक्षेपण ः स्टार १, ३
 वेळ ः सकाळी ९.३० पासून

चेंडू झपकन वळणार नाही
दूध गरम लागले की ताकही फुंकून पितात, अशीच काहीशी गत भारताच्या संघटकांची झाली आहे. पुण्यात फिरकीला साजेशी खेळपट्टी करण्याची खेळी त्यांच्यावर उलटली. त्यामुळे आता चिन्नास्वामी मैदानाची खेळपट्टी करताना चांगलीच काळजी घेतली जात आहे. खेळपट्टीवर कमी अधिक प्रमाणात गवत राहील. चेंडू झपकन वळणार नाही, असेच आता तरी वाटत आहे. त्याचबरोबर खेळपट्टीवरील पाण्याचा अंश कमी होऊ नये म्हणून झारीने पाणी मारले जात आहे. तरीही खेळपट्टी अजूनही कोरडीच वाटत आहे. त्यामुळे येथेही चेंडू वळण्याची अपेक्षा असली तरी ते झपकन वळणार नाहीत, असा अंदाज आहे.

अहंकार विसरून चूक मान्य करावी : कोहली
आधीच्या सामन्यातील यश किंवा अपयश विसरून दुसऱ्या सामन्यासाठी मैदानात उतरायचे असते. नव्या उत्साहाने नवा सामना खेळण्यातच खेळाची मजा असते. अहंकार विसरून चूक मान्य करता यायला हवी. चुका मान्य न करता कारणे देऊ लागलो, तर कधीच सुधारणा होत नाही. आम्ही पुण्यात चुकलो, पण पुन्हा तशी खराब कामगिरी आमच्याकडून होणार नाही, अशा शब्दात भारताचा कर्णधार विराट काहेली याने चाहत्यांना विश्‍वास दिला. 

कोहली म्हणाला, ‘‘प्रत्येक कसोटी सामन्याला सामोरे जाताना आमची तयारी तितक्‍याच जोराने असते. यश आणि अपयश खेळाचा अविभाज्य भाग आहे. आम्ही संघ म्हणून एकत्र कसे राहता येईल याचा विचार करतो. पत्रकार किंवा टीकाकार काय म्हणतात याकडे जास्त लक्ष देत नाही. यशानंतर होणाऱ्या स्तुतीलाही जास्त मनावर घेत नाही.बंगळूरची खेळपट्टी मस्त आहे. गेल्या सामन्यातील अपयश मागे टाकून ताज्या मनाने आम्ही दुसऱ्या कसोटीत उतरणार आहोत. खेळपट्टीचा चेहरा सामन्याच्या अगोदर कसा असेल, त्यानुसार आम्ही अंतिम अकरा खेळाडूंची निवड करू.’’

भारताकडून प्रतिआक्रमण अपेक्षित : स्मिथ
पहिल्या सामन्यातील विजयाने आम्ही निश्‍चित आनंदी आहोत. एखाद्या कठिण मालिकेची किंवा दौऱ्याची सुरवात विजयाने होणे केव्हाही चांगले असते. भारताविरुद्ध भारतात खेळताना मालिकेची सुरवात विजयाने होणे हे निश्‍चितच हुरूप वाढवणारे आहे. पण, आम्ही या यशाने हुरळून गेलेलो नाही. भारतीय संघ लेचापेचा नाही. आयसीसी क्रमवारीत ते कसोटीत अव्वल आहे. त्यांच्याकडून आम्हाला प्रतिआक्रमण अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने व्यक्त केली. पुण्यातील परिस्थितीशी आम्ही जुळवून घेतले. बंगळूरमध्येही आमचे खेळाडू जळवून घेतील यात शंकाच नाही. अर्थात, ‘आयपीएल’मध्ये आमचे बरेचसे खेळाडू खेळत असल्याचा आम्हाला फायदा होत आहे. हे सर्वात महत्त्वाचे, असे सांगून स्मिथ म्हणाला, ‘‘नव्या नियोजनानुसार कसोटी खेळताना कुणावर कसे दडपण ठेवता येते याचा विचार महत्त्वाचा आहे. भारत प्रतिआक्रमण करेल, हे समजून घेऊन आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळू.’’

Web Title: india vs australi test match