भारतीयांची पुन्हा फिरकीसमोर नांगी; 189 धावांत गारद

वृत्तसंस्था
शनिवार, 4 मार्च 2017

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याची संधी होती. पण, भारतीय फलंदाजांनी ती गमाविली.

बंगळूर - पहिल्या कसोटीप्रमाणेच दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावातही भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांसमोर नांगी टाकल्याचे पहायला मिळाले. नॅथन लिऑनने 8 बळी घेत भारताचा डाव अवघ्या 189 धावांत संपुष्टात आणला. भारताकडून सलामीवीर लोकेश राहुलने सर्वाधिक 90 धावा केल्या.

पहिल्या कसोटीत झालेल्या वाताहतीनंतर आता आजपासून (शनिवार) सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाला आपल्या कामगिरीत सुधार करता आला नाही. राहुलने एकाबाजूने शेवटपर्यंत फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फिरकीचा सामना केला. पण, त्याला एकाही भारतीय फलंदाजाकडून साथ मिळाली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारीत असलेले अव्वल स्थान सिद्ध करण्यासाठी कर्णधार कोहली आणि विराट सेनेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात जोरदार पुनरागमन करण्याची संधी होती. पण, भारतीय फलंदाजांनी ती गमाविली. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात जखमी मुरली विजयच्या जागी सलामीला अभिनव मुकुंदला आणि जयंत यादवच्या जागी करुण नायरला स्थान देण्यात आले आहे. मुकुंद मिळालेल्या संधीचे सोने करू शकला नाही. त्याला स्टार्कने शून्यावर पायचीत बाद केले. राहुल आणि पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा यशस्वी प्रतिकार केला. पण, लंचपूर्वी पुजाराला बाद करत लिऑनने भारताला दुसरा झटका दिला.

लंचनंतर मात्र, भारतीय फलंदाजांनी लिऑनच्या फिरकीसमोर नांगीच टाकली. कोहली, रहाणे, नायर, आश्विन, साहा, जडेजा आणि ईशांत असे एकापाठोपाठ एक जणू पॅव्हेलियनकडे परतण्याची स्पर्धाच सुरु झाली. भारताच्या अवघ्या पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. नॅथन लिऑन कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करत आठ बळी मिळविले.

Web Title: India vs Australia 2nd test in Bangalore