भारतीयांचा रिव्हर्स स्विपचा सराव 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सरावानंतरच्या पत्रकार परिषदेत वृद्धिमान साहा याने यास फारसे महत्त्व देणे टाळले. "विशिष्ट प्रकारच्या चेंडूचा कसा विविध प्रकारे सामना करता येईल, याकडे सरावात लक्ष होते. एखादा गोलंदाज लक्षात घेऊन हा सराव झालेला नाही. याच प्रकारचे शॉटस्‌ खेळावे, अशी कोणतीही सक्ती सरावाच्या वेळी करण्यात आली नव्हती,' असे त्याने सांगितले. 

कोलकता : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी भारतीय फलंदाजांनी उसळत्या चेंडूंचा सामना करण्याबरोबरच रिव्हर्स स्विपच्या सरावावर जास्त भर दिला. भारत-श्रीलंका मालिकेतील पहिली कसोटी 16 नोव्हेंबरपासून ईडन गार्डनवर सुरू होत आहे. 

भारतीय संघातील सपोर्ट स्टाफने विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल या आघाडीच्या फलंदाजांना सपोर्ट स्टाफने उसळत्या चेंडूचा सामना करण्यास भाग पाडले. रणजी लढतीत अपयशी ठरलेल्या रहाणेला सर्वाधिक सराव करण्यास भाग पाडण्यात आले. त्याने उसळत्या चेंडूंचा सलग अर्धा तास सराव केला. 

भारतीयांनी फलंदाजीचा सराव करताना फलंदाजीच्या क्रमानेच सराव केला. राहुल आणि धवन या सलामीवीरांना एकाच वेळी फिरकी; तसेच उसळत्या चेंडूंचा सामना करण्यास भाग पाडण्यात आले. सलामीवीर व्हीमध्ये प्रामुख्याने खेळत होते, तर रहाणेने रविचंद्रन अश्विन; तसेच कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विपसह अनेक अपारंपरिक शॉट्‌स खेळले. हेच कोहलीनेही केले. 

सरावानंतरच्या पत्रकार परिषदेत वृद्धिमान साहा याने यास फारसे महत्त्व देणे टाळले. "विशिष्ट प्रकारच्या चेंडूचा कसा विविध प्रकारे सामना करता येईल, याकडे सरावात लक्ष होते. एखादा गोलंदाज लक्षात घेऊन हा सराव झालेला नाही. याच प्रकारचे शॉटस्‌ खेळावे, अशी कोणतीही सक्ती सरावाच्या वेळी करण्यात आली नव्हती,' असे त्याने सांगितले. 

मुंबईची रणजी लढत संपल्यावर काही तासांतच कोलकतामध्ये दाखल झालेला रहाणे सराव सत्रात सहभागी झाला; पण सौराष्ट्रकडून रणजी लढत खेळलेल्या चेतेश्वर पुजारा आणि रवींद्र जडेजाने ब्रेक घेतला. रहाणे, रोहित शर्मा, रवी शास्त्री यांनी स्वतंत्रपणे जात खेळपट्टीची पाहणी केली.