दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा एकतर्फी विजय 

सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

भारतीय वेगवान गोलंदाजीचे कितीही गोडवे यजमानांचे आजी माजी खेळाडू गात असले, तरी भारतीय फिरकीचा प्रभाव त्यांच्यावर अजूनही असल्याचे सिद्ध झाले. चहल आणि कुलदीप या फिरकी जोडीने एकत्रित 14.2 षटके टाकताना फक्त 42 धावा दिल्या आणि यजमानांचे आठ फलंदाज बाद केले. भारतीय फिरकीचे "होमवर्क' केल्याचे सांगणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनाला आता तोंड दाखवायला जागा उरली नाही. 

सेंच्युरियन : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील रविवारी झालेला दुसरा सामना फुसका बार निघाला. भारतीय फिरकी गोलंदाजांनी आपली दहशत कायम ठेवली. त्यानंतर फलंदाजांनी सामना एकाच सत्रात संपण्याची काळजी घेतली. मात्र, केवळ पंचांनी नियमावर बोट दाखविल्यामुळे विजयाच्या दोन धावांसाठी दुसऱ्या सत्राच्या पहिल्या षटकातील तीन चेंडूंची वाट पाहावी लागली. भारताने हा सामना 9 गडी राखून जिंकला. 

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कसोटीत बोलबाला राहिलेल्या वेगवान गोलंदाजांपेक्षा युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडीनेच कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. त्यांनी 32.2 षटकांतच दक्षिण आफ्रिकेचा डाव 118 धावांत गुंडाळला. युजवेंद्रने पाच, तर कुलदीपने दोन गडी बाद केले. त्यानंतर पहिल्या सत्रातील उर्वरित वेळेत फलंदाजी करताना भारताने आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. भारताचा धडाका पाहून पंचांनी नियमानुसार पंधरा मिनिटे सत्राची वेळ लांबवली; पण यात निर्णय लागू शकला नाही. त्यामुळे पंचांनी उपाहाराचा निर्णय घेऊन खेळ थांबवला. अर्थात, त्या वेळी भारताला विजयासाठी केवळ दोनच धावांची गरज होती. पंचांच्या या निर्णयावर खरे तर भारतीय कर्णधार कोहली काहीसा चिडला होता. उपाहारानंतर पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर विजयाची औपचारिकता कोहली- धवन जोडीने पूर्ण केली. भारताने 20.3 षटकांत 1 बाद 119 धावा केल्या. धवन 51, तर कोहली 46 धावांवर नाबाद राहिला. सामन्याचा मानकरी अर्थातच युजवेंद्र चहल ठरला. 

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिस आणि ए बी डिव्हिलर्स शिवाय खेळणाऱ्या यजमान संघाच्या फलंदाजांसमोर मोठे आव्हान होते. भुवनेश्‍वर कुमारने सर्वात महत्त्वाची हशीम आमलाची विकेट काढल्यावर पुढचे काम फिरकी गोलंदाजांनी पार पाडले. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या फिरकीचा कोणताच अंदाज यजमानांच्या फलंदाजांना आला नाही. काही फलंदाज धोका पत्करण्याच्या नादात, तर काही जण चेंडू कसा खेळायचा या द्विधा मनःस्थितीत बाद झाले. एकदिवसीय ऐवजी टी 20 सामना चालू असल्याचा भास या सामन्यात आला. जे पी ड्युमिनी आणि नवोदित खेळाडू झोंडोने प्रत्येकी 25 धावा केल्याने निदान 100चा आकडा पार झाला. 

भारतीय वेगवान गोलंदाजीचे कितीही गोडवे यजमानांचे आजी माजी खेळाडू गात असले, तरी भारतीय फिरकीचा प्रभाव त्यांच्यावर अजूनही असल्याचे सिद्ध झाले. चहल आणि कुलदीप या फिरकी जोडीने एकत्रित 14.2 षटके टाकताना फक्त 42 धावा दिल्या आणि यजमानांचे आठ फलंदाज बाद केले. भारतीय फिरकीचे "होमवर्क' केल्याचे सांगणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघ व्यवस्थापनाला आता तोंड दाखवायला जागा उरली नाही. 

विजयाकरिता 119 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांना कोणतीच अडचण आली नाही. रबाडाने रोहित शर्माला बाद केल्यावर शिखर धवन आणि विराट कोहली एकत्र जमले. दोघांनी समोर आलेल्या प्रत्येक गोलंदाजावर हुकमत गाजवून थाटात भारताचा विजय साकार केला. या दिल्लीच्या जोडगोळीने 93 धावांची अखंड भागीदारी केली. 

संक्षिप्त धावफलक 
दक्षिण आफ्रिका 36.4 षटकांत सर्वबाद 118 (जेपी ड्युमिनी 25, हशिम आमला 23, क्वींटॉन डी कॉक 20, खाया झोंडो 25, युजवेंद्र चहल 5-22, कुलदीप यादव 3-20) पराभूत वि. भारत 20.3 षटकांत 1 बाद 119 (शिखर धवन नाबाद 51- 56 चेंडू, 9 चौकार, विराट कोहली नाबाद 46- 50 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार)

Web Title: INDvsSA India beat South Africa in 2nd ODI