परदेशी क्रिकेटपटू तर 'फटीचर'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 मार्च 2017

इम्रान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये गदारोळ
कराची - पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू फटीचर आहेत, असे वक्तव्य विश्‍वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी केले. यामुळे वाद निर्माण झाला असून अनेक क्रिकेटप्रेमींनी इम्रान यांच्यावर टीका केली आहे.

इम्रान यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये गदारोळ
कराची - पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेले खेळाडू फटीचर आहेत, असे वक्तव्य विश्‍वविजेते कर्णधार इम्रान खान यांनी केले. यामुळे वाद निर्माण झाला असून अनेक क्रिकेटप्रेमींनी इम्रान यांच्यावर टीका केली आहे.

इम्रान यांचे वक्तव्य एका स्थानिक पत्रकाराने मोबाईलवर रेकॉर्ड केले. त्यानंतर त्याने ते "ऑनलाइन' टाकले. पाकिस्तान सुपर लीगचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातीमध्ये पार पडला. अंतिम सामना मात्र लाहोरला होणार आहे. या स्पर्धेत नऊ परदेशी खेळाडूंचा सहभाग होता. अंतिम सामना पाकमध्ये घेऊन तेथे क्रिकेट खेळण्यास धोका नसल्याचे दाखवून देण्याचा पाकिस्तानी क्रिकेट मंडळाचा प्रयत्न आहे. इम्रान यांनी मात्र सुरक्षेच्या कारणावरूनच लाहोरमधील आयोजनास विरोध केला. इम्रान यांनी "तेहरिक-ए-इन्साफ' या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. ते पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे कट्टर विरोधक आहेत.

त्यांनी सांगितले की, "डॅरेन सॅमी वेस्ट इंडीजचा कर्णधार होता हे ठीक आहे, पण तो काही मातब्बर खेळाडू नाही. ख्रिस गेल, केव्हिन पीटरसन असे खेळाडू आले असते तर ठीक होते. मला वाटते की, संयोजकांनी आफ्रिका आणि इतर ठिकाणांहून काही जणांना पकडून आणले. ते परदेशी खेळाडू असल्याचा दावा केला जात आहे. मला या "फटीचर' खेळाडूंची नावेसुद्धा माहीत नाहीत' इम्रान यांनी "फटीचर' शब्द उच्चारताच त्यांच्या बाजूला बसलेले लोक हसले.

वास्तविक सॅमीने वेस्ट इंडीजच्या दोन्ही टी-20 जगज्जेतेपदात मोलाचा वाटा उचलला आहे. या स्पर्धेतही पेशावर झाल्मीला त्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळाला. सॅमीची नाचण्याची स्टाइल पाकिस्तानमध्येही सुपरहिट ठरली आहे. मुख्य म्हणजे गेलने स्पर्धेत भाग घेतला होता. तो कराची किंग्जकडून दुबई व शारजातील सामने खेळला, पण हा संघ अंतिम फेरी गाठू शकला नाही. इंग्लंडच्या पीटरसन, ल्यूक राइट व टायमल मिल्स तसेच दक्षिण आफ्रिकेच्या रिली रॉसोयू यांनी सुरक्षेच्या कारणावरून माघार घेतली होती.

हा व्हिडिओ व्हायरल होताच काही क्रिकेटप्रेमींनी इम्रान यांचा निषेध केला. रबिया नवीदने ट्‌विट केले की, "पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा व्हावे म्हणून अशा कथित निःस्वार्थी नेत्यांच्या तुलनेत "फटीचर' खेळाडूंनी कितीतरी जास्त प्रयत्न केले आहेत.' डॉ. शेफिल्ड याने ट्‌विट केले की, "मी तुमचा कट्टर चाहता आहे, पण लाखो चाहत्यांप्रमाणेच निराश झालो आहोत. तुम्ही भानावर होता की तुमचे मन मेले आहे?'

अशी टीका सुरू होताच इम्रान यांनी एक पाऊल मागे घेतले. त्यासाठी त्यांनी "ट्‌विटर'चा आधार घेतला. या लढतीला इतक्‍या मोठ्या संख्येने आणि उत्साहाने प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी प्रेक्षकांचे अभिनंदन केले.
पाकिस्तानात 2009 मध्ये श्रीलंका संघाच्या बसवर गोळीबार झाला. तेव्हापासून तेथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट झालेले नाही. या लढतीमुळे सत्ताधारी सरकारला श्रेय मिळेल म्हणून इम्रान द्वेष करीत असल्याचे काहींनी सूचित केले.

पाकिस्तान संसदेतही पडसाद
हा वाद संसदेपर्यंत पोचला. संरक्षण मंत्री ख्वाजा असिफ यांनी इम्रान यांचा निषेध केला. "मी अशा अपमानास्पद वक्तव्याचा उच्चारसुद्धा करू इच्छित नाही, याचे कारण त्यामुळे खेळाडूंचा घोर अपमान झाला आहे.

Web Title: international cricket player fatichar