'रॉयल चॅलेंजर्स'ला धक्का; के. एल. राहुलही स्पर्धेबाहेर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 31 मार्च 2017

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा संघ : 
विराट कोहली, एबी डिव्हिलर्स, ख्रिस गेल, केदार जाधव, श्रीनाथ अरविंद, आवेश खान, सॅम्युअल बद्री, स्टुअर्ट बिन्नी, युझवेंद्र चहल, अनिकेत चौधरी, प्रवीण दुबे, ट्रॅव्हिस हेड, इक्‍बाल अब्दुल्ला, सर्फराज खान, मनदीपसिंग, टायमल मिल्स, ऍडम मिल्ने, पवन नेगी, हर्षल पटेल, लोकेश राहुल, सचिन बेबी, तबरेझ शम्सी, बिली स्टॅनलेक, शेन वॉटसन.

बंगळूर: 'इंडियन प्रीमिअर लीग'चा (आयपीएल) दहावा मोसम सुरू होण्यापूर्वीच 'रॉयल चॅलेंजर्स बंगळूर'च्या संघाला दुखापतींमुळे धक्के बसत आहेत. भरवशाचा सलामीवीर आणि यंदाच्या मोसमात सुरेख सूर गवसलेल्या के. एल. राहुलचा खांदा दुखावला आहे. यामुळे यंदाच्या संपूर्ण मोसमालाच त्याला मुकावे लागणार आहे. यापूर्वी 'रॉयल चॅलेंजर्स'चा कर्णधार विराट कोहली याच्याही खांद्याला दुखापत झाली होती आणि तोही सुरवातीचे काही सामने न खेळण्याची शक्‍यता आहे. 

फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यामध्ये राहुलच्या खांद्याला दुखापत झाली होती. तरीही तो पुढील तीन कसोटी खेळला. ही कसोटी मालिका संपल्यानंतर राहुलच्या दुखापतीची तपासणी झाली. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार, राहुलच्या खांद्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया केली जाणार आहे. येत्या जूनमध्ये इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होण्यासाठी राहुल प्रयत्नशील असेल. त्यामुळे त्याने 'आयपीएल'मधून माघार घेतली आहे, असे वृत्त 'विस्डेन इंडिया'ने प्रसिद्ध केले आहे. दुखापत असतानाही राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील चार सामन्यांत सहा अर्धशतके झळकाविली. 

दुसरीकडे, कर्णधार विराट कोहलीही अद्याप खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. त्यामुळे 'आयपीएल-10'मधील सुरवातीच्या काही सामन्यांत कोहली खेळणार नाही, हे जवळपास निश्‍चित आहे. अशा स्थितीत राहुलच्या अनुपस्थितीचाही 'रॉयल चॅलेंजर्स'ला फटका बसू शकतो. कोहलीच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलर्स किंवा ख्रिस गेलकडे 'रॉयल चॅलेंजर्स'चे नेतृत्व सोपविले जाऊ शकते. 

Web Title: IPL 10; After Virat Kohli, KL Rahul of RCB injured