'पुण्याच्या विजयात धोनीची असेल महत्त्वाची भूमिका'

वृत्तसंस्था
रविवार, 21 मे 2017

माझ्या मते पुण्याचा संघच जिंकेल. प्लेऑफच्या लढतीत त्यांनी मुंबईचा पराभव केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. बेन स्टोक्सची उणीव त्यांना भासेल. पण, धोनीने शेवटच्या दोन षटकांमध्ये केलेल्या 40 धावा त्यांना विजय मिळवून देण्यात पुरेशा ठरतील. धोनीला अंतिम सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे.

नवी दिल्ली - आयपीएलच्या दहाव्या मोसमातील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करताना रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघातून महेंद्रसिंह धोनीची भूमिका महत्त्वाची असेल, असा अंदाज भारताचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीन याने व्यक्त केला आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील अंतिम सामना आज (रविवार) हैदराबादमध्ये होत आहे. पुणे आणि मुंबई हे दोन्ही संघ अंतिम फेरीत लढत असून, यापूर्वी या मोसमात पुण्याने मुंबईला तीनवेळा पराभूत केले आहे. त्यामुळे पुणे संघाचे पारडे जड वाटत असताना, अझरुद्दीनेही पुणे संघालाच पसंती दिली आहे. तसेच धोनीची भूमिका पुण्याच्या विजयात मोलाची ठरेल, असे म्हटले आहे.

अझरुद्दीन म्हणाला, की माझ्या मते पुण्याचा संघच जिंकेल. प्लेऑफच्या लढतीत त्यांनी मुंबईचा पराभव केल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. बेन स्टोक्सची उणीव त्यांना भासेल. पण, धोनीने शेवटच्या दोन षटकांमध्ये केलेल्या 40 धावा त्यांना विजय मिळवून देण्यात पुरेशा ठरतील. धोनीला अंतिम सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. तो मुंबईविरुद्ध उपयोगी ठरेल. तसेच धोनीच्या नेतृत्वाखाली यापूर्वी आयपीएल स्पर्धाही जिंकण्यात आल्या आहेत. धोनीने कर्णधार म्हणून नेहमीच विजय मिळविला आहे. पण, खेळाडू म्हणून त्याला विजय मिळविण्याची संधी आहे. स्मिथ आणि धोनी मिळून चांगली कामगिरी करत आहेत. धोनीची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्याविरोधात मी होतो.