जिमी निशॅमही दुखापतग्रस्त; न्यूझीलंडच्या अडचणी वाढल्या

वृत्तसंस्था
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

कोलकाता : बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशॅम भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पहिल्या सामन्यापूर्वीच दुखापतींनी त्रस्त झालेल्या न्यूझीलंडसमोरील अडचणींमध्ये वाढच झाली आहे.

कोलकाता : बरगड्यांना झालेल्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशॅम भारताविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पहिल्या सामन्यापूर्वीच दुखापतींनी त्रस्त झालेल्या न्यूझीलंडसमोरील अडचणींमध्ये वाढच झाली आहे.

कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत खेळलेला मार्क क्रेगही दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जागी जीतन पटेल या फिरकी गोलंदाजाचा संघात समावेश करण्यात आला. मात्र, न्यूझीलंडहून भारतात येणारी फ्लाईट ऐनवेळी रद्द झाल्याने जीतन पटेलचे भारतातील आगमन लांबले आहे. आता तो आज (बुधवार) मध्यरात्रीनंतर भारतात पोचेल. दुसरी कसोटी शुक्रवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे येथील वातावरणाशी जुळवून घेत लगेचच मैदानावर उतरण्याचे आव्हान पटेलसमोर असेल.

जिमी निशॅमच्या स्वरूपात न्यूझीलंडकडे एका अष्टपैलू खेळाडूचा पर्याय होता. पण तो दुखापतीतून सावरला नसल्याने या कसोटीतूनही तो बाहेर पडला आहे. 'या दुखापतीमुळे संघात बदल करण्याचे पर्यायच संपले आहेत. फलंदाजी चांगली करू शकणारा अष्टपैलू खेळाडू आता आम्हाला तातडीने उपलब्ध होऊ शकत नाही. न्यूझीलंडमध्येही काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे उपलब्ध खेळाडूंमधूनच संघाची निवड करावी लागणार आहे,' अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांनी व्यक्त केली.

दिल्लीमध्ये सराव करताना निशॅमच्या बरगड्यांना दुखापत झाली होती. सूर हरपलेल्या मार्टिन गुप्टीलची संघातील जागा घेण्यासाठी आता हेन्री निकोल्स या डावखुरा फलंदाजाचा एकमेव पर्याय न्यूझीलंडसमोर आहे. निकोल्सने आतापर्यंत सहा कसोटींमध्ये एक अर्धशतक झळकाविले आहे.