कुलदीपसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला; सर्वबाद 300

सुनंदन लेले
शनिवार, 25 मार्च 2017

धावफलक : 
ऑस्ट्रेलिया : पहिला डाव : 88.3 षटकांत सर्वबाद 300 

डेव्हिड वॉर्नर 56, मॅट रेनशॉ 1, स्टीव्ह स्मिथ 111, शॉन मार्श 4, पीटर हॅंड्‌सकोम्ब 8, ग्लेन मॅक्‍सवेल 8, मॅथ्यू वेड 57, पॅट कमिन्स 21, स्टीव्ह ओकीफ 8, नॅथन लायन नाबाद 13, जोश हेझलवूड 2 
अवांतर : 11 
गोलंदाजी : 

भुवनेश्‍वर कुमार 1-41, उमेश यादव 2-69, आर. आश्‍विन 1-54, रवींद्र जडेजा 1-57, कुलदीप यादव 4-68

धरमशाला : धौलगिरी पर्वतावरचे ढग जसे क्षणाक्षणाला रंगरूप बदलत होते, तसेच चौथ्या कसोटीने रंग बदलले. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आणि मालिकेतील तिसरे शतक झळकावून भारतीय संघाला बॅटने पाणी पाजले. त्यानंतर वर्चस्व गाजविले भारतीय गोलंदाजांनी! पदार्पण करणाऱ्या कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना कोंडीत पकडले आणि चार विकेट्‌स मिळविल्या. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाज गोंधळात पडल्याने धरमशालाच्या चांगल्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याचा अपेक्षित फायदा ऑस्ट्रेलियाला घेता आला नाही. 

या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांत संपुष्टात आला. दिवसअखेरीस भारतीय सलामीवीरांना एक षटक फलंदाजी करावी लागली; पण यात के. एल. राहुलने कोणतेही नुकसान होऊ दिले नाही. 

अपेक्षेनुसार, दुखापतीमुळे कर्णधार विराट कोहलीने सामन्यातून माघार घेतली. नाणेफेकीला येताना नवा कर्णधार अजिंक्‍य रहाणेने संघात दोन बदल केले. विराट कोहली आणि ईशांत शर्मा यांच्या जागी कुलदीप यादव आणि भुवनेश्‍वर कुमार यांना संघात स्थान मिळाले. भारतीय संघाची मानाची 'कॅप' कुलदीपला लक्ष्मण शिवरामकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कोहली संघात नसतानाही पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचे भारतीय संघाचे धाडस कौतुकास्पदच होते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणताही बदल झाला नाही. 

धरमशालाच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून स्मिथने फलंदाजीचा निर्णय घेतला. भुवनेश्‍वर कुमारने टाकलेल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा कठीण झेल करुण नायरला पकडता आला नाही. त्यानंतर उमेश यादवने एका अप्रतिम चेंडूवर मॅट रेनशॉचा त्रिफळा उडविला. मैदानात आल्यापासून स्टीव्ह स्मिथ भलत्याच आत्मविश्‍वासाने फलंदाजी करू लागला. समोर डेव्हिड वॉर्नर अत्यंत अडखळत फलंदाजी करत होता. दोघांनी मिळून उपाहारापर्यंत भारतीय संघाला आणखी यश मिळू दिले नाहीच, शिवाय वेगाने धावाही केल्या. भारतीयांना काही समजण्याच्या आतच स्मिथचे अर्धशतक पूर्ण झाले. उपाहारापूर्वी काही वेळ वॉर्नरने या मालिकेतील पहिले अर्धशतक झळकाविले. 

'चायनामन' गोलंदाज कुलदीप यादवला कधी गोलंदाजी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष होते. पण पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भरात असताना रहाणेने कुलदीपला दूर ठेवण्याची चतुराई दाखविली. उपाहारानंतर स्मिथ-वॉर्नर अधिक आक्रमक भूमिका स्वीकारतील, असे वाटले होते. पण याचवेळी रहाणेने कुलदीपला गोलंदाजीला आणले. त्याच्या गोलंदाजीवर रहाणेनेच स्लीपमध्ये वॉर्नरचा झेल पकडला. त्यानंतर उमेश यादवच्या एका साध्या चेंडूवर शॉन मार्शने विकेट बहाल केली. त्यानंतरच्या अर्ध्या तासात धरमशालाच्या मैदानावर कुलदीप यादवची जादू पाहायला मिळाली. 

पीटर हॅंड्‌सकोम्बला कुलदीपने 'चायनामन' (म्हणजे डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने टाकलेला लेगस्पीन) टाकून त्याचा त्रिफळा उडविला. त्यानंतर त्याहीपेक्षा भन्नाट चेंडू ग्लेन मॅक्‍सवेलला टाकला. डावखुऱ्या कुलदीपच्या गुगलीचा मॅक्‍सवेलला अजिबात अंदाज आला नाही. बॅकफूटवर खेळण्याचा प्रयत्न करताना मॅक्‍सवेलचाही त्रिफळा उडाला. 

समोरून चार फलंदाज बाद झाल्याचा स्मिथवर मात्र काडीमात्रही परिणाम झाला नाही. त्याने 150 चेंडूंत 13 चौकार मारत मालिकेतील तिसरे शतक साजरे केले. कोणत्याही भारतीय गोलंदाजाला तो यश मिळू देत नव्हता. चहापानाआधी काही वेळ आर. आश्‍विनने स्मिथचा अडथळा दूर केला. यावेळीही रहाणेनेच सुंदर झेल पकडला. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात भारताने पाच फलंदाज बाद केले आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या धावांचा ओघही रोखला. 

तिसऱ्या सत्रात कुलदीपने पॅट कमिन्सला बाद केले. बदली खेळाडू श्रेयस अय्यरच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे स्टीव्ह ओकीफ धावबाद झाला. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने एका बाजूने संयमी फलंदाजी करत अर्धशतक झळकाविले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 300 पर्यंत पोहचू शकली. जडेजाला उंच फटका मारण्याच्या प्रयत्नांत वेड बाद झाला आणि पुढच्याच षटकात भुवनेश्‍वरने नॅथन लायनला बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव संपविला. 

भारताकडून कुलदीपने चार गडी बाद केले. उमेश यादवने दोन, तर आश्‍विन-जडेजा-भुवनेश्‍वरने प्रत्येकी एक गडी बाद केला. दिवसाच्या उरलेल्या खेळातील एक षटक राहुलने शांतपणे खेळून काढले. आता उद्या (रविवार) भारतीय संघ फलंदाजी करणार असल्याने धरमशालाच्या सुरेख मैदानावर प्रेक्षक गर्दी करणार आहेत.