चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी मलिंगा श्रीलंकेच्या संघात 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

श्रीलंकेचा संघ : 
अँजेलो मॅथ्यूज (कर्णधार), उपुल थरंगा (उपकर्णधार), निरोशन डिकवेला, कुशल परेरा, कुशल मेंडिस, चमारा कपुगेदरा, असेला गुणरत्ने, दिनेश चंडिमल, लसिथ मलिंगा, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, नुवान कुलशेखरा, थिसरा परेरा, लक्षन संदकन, सिक्कुगे प्रसन्ना.

कोलंबो : गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या लसिथ मलिंगाला आगामी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठीच्या संघात श्रीलंकेने स्थान दिले आहे. यापूर्वी मलिंगाने 2015 च्या नोव्हेंबरमध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. 

इंग्लंडमध्ये जूनमध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर झाला आहे. स्नायू दुखापतीमुळे गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला कर्णधार अँजेलो मॅथ्यूजही पूर्ण तंदुरुस्त झाला आहे. या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका, ऑस्ट्रेलिया दौरा आणि बांगलादेशविरुद्धच्या मायदेशातील मालिकेस मॅथ्यूज मुकला होता. सध्या मॅथ्यूज आणि मलिंगा दोघेही 'आयपीएल'मध्ये खेळत आहेत. 

मलिंगाला दीर्घकाळापासून गुडघ्याच्या दुखापतींनी सतावले आहे. गेल्या वर्षभरात तो एकच ट्‌वेंटी-20 सामना खेळला. त्यानंतर पुन्हा झालेल्या दुखापतीमुळे त्याने ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतूनही माघार घेतली होती. 

महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिल्शान आणि कुमार संगाकारा हे तीन अनुभवी खेळाडू निवृत्त झाल्याने श्रीलंकेच्या संघात प्रामुख्याने नवोदितांचा भरणा आहे. कर्णधार मॅथ्यूज, उपकर्णधार उपुल थरंगा, चमारा कपुगेदरा, दिनेश चंडिमल आणि थिसरा परेरा हेच अनुभवी फलंदाज श्रीलंकेकडे आहेत.