न्यूझीलंडने बिघडवली भारताच्या विजयाची चव

शैलेश नागवेकर
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

न्यूझीलंड भारतापेक्षा कितीही मागे असले तरी ते अधूनमधून भारी ठरलेले आहेत. आज वानखेडे स्टेडियमवरील सामनाही त्यास अपवाद नव्हता. आपल्या दोनशेव्या एकदिवसीय सामन्यात विराटने केलेल्या 121 धावांच्या जोरावर उभारलेल्या 280 धावांचे संरक्षण भारतीय गोलंदाज करू शकले नाहीत.

मुंबई : भारताने मिळवलेल्या सलग सहा एकदिवसीय मालिका विजयांच्या अवीट गोडीमध्ये न्यूझीलंडने मिठाचा खडा टाकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिलाच सामना त्यांनी सहा विकेटने थाटात जिंकला. प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीच्या जोरावर विराट कोहलीने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली, तर शतकवीर टॉम लॅथम आणि रॉस टेलर यांची द्विशतकी भागीदारी किती तरी पटीने सरस ठरली. 

न्यूझीलंड भारतापेक्षा कितीही मागे असले तरी ते अधूनमधून भारी ठरलेले आहेत. आज वानखेडे स्टेडियमवरील सामनाही त्यास अपवाद नव्हता. आपल्या दोनशेव्या एकदिवसीय सामन्यात विराटने केलेल्या 121 धावांच्या जोरावर उभारलेल्या 280 धावांचे संरक्षण भारतीय गोलंदाज करू शकले नाहीत. याच गोलंदाजांनी गेल्या काही महिन्यांपासून मोठी मर्दुमकी गाजवलेली आहे. त्यामुळे सलग मालिका विजयाची माळ गुंफता आली होती. आजच्या पराभवामुळे मात्र खडबडून जागे केले आहे. न्यूझीलंडने 49 षटकांत 4 बाद 284 धावा केल्या. 

अगोदर "अ' संघांविरुद्धची मालिका आणि पहिला सराव सामना यामध्ये पराभव सहन करावा लागलेल्या न्यूझीलंड संघाने ऐन मोक्‍याच्या क्षणी कामगिरी उंचावली. काही दिवसांपूर्वी मुंबईतीलच दुसऱ्या सराव सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी 189 चेंडूतच 200 धावांची भागीदारी करून भारताच्या तोंडून घास हिरावला. न्यूझीलंडचे पहिले तीन फलंदाज 80 धावांत बाद केले तेव्हा 80 टक्के सामना भारताच्या बाजूने झुकला होता; परंतु लॅथम आणि टेलरने न्यूझीलंडच्या फलंदाजीची तटबंदी भक्कम केली त्याच वेळी त्यांनी भारताच्या कमजोर पडलेल्या क्षेत्ररक्षणाचाही फायदा घेतला. सहा मालिका विजयांमध्ये हे क्षेत्ररक्षण निर्णायक ठरले होते. केदार जाधवने सोडलेला सोपा झेल, त्यानंतर जमलेल्या टेलर आणि लॅथम यांना धावचीत करण्याची सोडलेली संधी भारतासाठी विजयाचीही संधी गमावणारी ठरली. 
त्यापूर्वी, मुंबईत वाढलेल्या आर्द्रतेत फलंदाजी करणे सोपे नव्हते. यात दुपारी फलंदाजी करण्याचा निर्णय कोहलीच्या क्षमतेची परीक्षा पाहत होता. एरवी त्याच्यासारखा फिट खेळाडू भारतीय संघात नाही; परंतु आज तो प्रत्येक षटकानंतर पाणी घेत होता. थकला होता तरीही खेळपट्टीवर खंबीरपणे उभा होता. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी निराशा केल्यानंतर कोहलीला दिनेश कर्तिक आणि धोनी यांच्या अनुक्रमे 73 आणि 57 धावांच्या भागीदारीचे साह्य लाभले. त्या वेळी अडीचशे धावांचे उद्दिष्ट होते; परंतु भुवनेश्‍वर कुमारच्या 26 धावांच्या योगदानामुळे भारताला 280 पर्यंत मजल मारता आली होती. 

संक्षिप्त धावफलक-
भारत ः 50 षटकांत 8 बाद 280 (रोहित शर्मा 20 - 18 चेंडूत 2 षटकार, विराट कोहली 121 -125 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकार, दिनेश कार्तिक 37, महेंद्रसिंह धोनी 25, भुवनेश्‍वर कुमार 26 - 15 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार, साऊदी 73-3, बोल्ट 35-4) पराभूत वि. न्यूझीलंड ः 49 षटकांत 4 बाद 284 (गुप्टिल 32, रॉस टेलर 95 - 100 चेंडूत 8 चौकार, टॉम लॅथम 103 - 102 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार, भुवनेश्‍वर 1-56, बुमरा 1-56).