...म्हणून भारताचे खेळाडू गुणवान आहेत : महेला जयवर्धने

वृत्तसंस्था
शनिवार, 6 मे 2017

'आयपीएल'मध्ये तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर एकाच ड्रेसिंग रूममध्ये राहण्याची संधी मिळते. त्यातून ते भरपूर शिकतात. शिवाय, अलीकडच्या काळात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी दिलेल्या बहुतांश खेळाडूंनी 'आयपीएल'मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 
- महेला जयवर्धने, 'मुंबई इंडियन्स'चे प्रशिक्षक 

मुंबई : भारतातील देशांतर्गत क्रिकेटची व्यवस्था परिपूर्ण आणि दर्जेदार असल्यानेच येथून सातत्याने गुणवान खेळाडू गवसत आहेत, असे मत 'मुंबई इंडियन्स'चे प्रशिक्षक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनी व्यक्त केले. जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली 'आयपीएल 10'मध्ये खेळणाऱ्या 'मुंबई इंडियन्स'च्या संघातून यंदा नितिश राणा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या तीन तरुण खेळाडूंनी चांगलीच छाप पाडली आहे. 

याशिवाय 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' संघाच्या रिषभ पंत, संजू सॅमसन यांनीही जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. 'आयपीएल'च्या यंदाच्या मोसमात परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंच्याच दमदार कामगिरीचीही चर्चा आहे. 

मुंबई आणि दिल्लीमध्ये आज लढत होणार आहे. काल (शुक्रवार) माध्यमांशी संवाद साधताना जयवर्धने यांनी भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थेविषयीही भाष्य केले. 'अगदी पहिली 'आयपीएल' पाहिली, तरीही तुमच्या लक्षात येईल, की किती गुणवान खेळाडू समोर येत आहेत. रवींद्र जडेजा आणि युसूफ पठाण हे दोघे 'राजस्थान रॉयल्स'कडून खेळले. या स्पर्धेत मिळणाऱ्या अनुभवामुळे भारतीय तरुण क्रिकेटपटूंची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत खूपच सुधारत आहे. शिवाय, इतर देशांतील तरुण खेळाडूंना कमी वयातच असा अनुभव मिळत नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंची प्रगतीही वेगाने होत आहे,' असे जयवर्धने म्हणाले. 

'भारतामध्ये खेळताना कोणत्याही शहरात गेले, तरीही तिथे क्रिकेटच्या दर्जेदार सुविधा असल्याचे दिसते. याचा अर्थातच स्थानिक तरुणांना आणि क्रीडा संघटनांना फायदा होतो. गेल्या दहा वर्षांत ही स्थिती फारच सुधारली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल होतानाच या खेळाडूंची पुरेशी तयारी झालेली असते,' असेही जयवर्धने म्हणाले.