क्रिकेट : विंडीजच्या पराभवामुळे श्रीलंका 'वर्ल्ड कप'साठी पात्र 

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र न ठरण्याची दाट शक्‍यता होतीच. आमच्यासमोरचे आव्हान प्रचंड खडतर असल्याची जाणीवही होती. एक संघ म्हणून आम्ही सकारात्मक आहोत. पात्रता फेरी पुढच्या वर्षी आहे आणि आम्ही पुरेपूर तयारी करूनच मैदानात उतरू. 
- टॉबी रॅडफोर्ड 

लंडन : इंग्लंडकडून पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव झाल्यामुळे आता श्रीलंकेचा संघ 2019 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. विंडीजच्या पराभवामुळे श्रीलंकेला ही संधी मिळाली. 

2019 मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेत दहाच संघ खेळणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या आठ संघांना या स्पर्धेसाठी थेट पात्र ठरविण्यात आले. यापैकी 'आठव्या क्रमांकावर कोण राहणार' यासाठी श्रीलंका आणि वेस्ट इंडीजच्या संघात चुरस होती. या पात्रतेसाठी 30 सप्टेंबर रोजीचे मानांकन ग्राह्य धरले जाणार आहे. 

वेस्ट इंडीजचे सध्या 78 गुण आहेत आणि श्रीलंकेचे 86 गुण आहेत. इंग्लंडविरुद्धचे आगामी सर्व एकदिवसीय सामने जिंकले, तरीही वेस्ट इंडीज श्रीलंकेला मागे टाकू शकत नाही. त्यामुळे श्रीलंकेचा संघ थेट विश्‍वकरंडक स्पर्धेत दाखल झाला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये वेस्ट इंडीजला 4-0 किंवा 5-0 असा विजय मिळविणे गरजेचे होते. मात्र, पहिल्या सामन्यात इंग्लंडने दणदणीत विजय मिळवित हे स्वप्न उधळून लावले. 

दोन वेळा विश्‍वकरंडक जिंकणाऱ्या वेस्ट इंडीजला आता 2018 मध्ये होणाऱ्या विश्‍वकरंडक पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे. विंडीजसह अफगाणिस्तान, झिंबाब्वे आणि आयर्लंड या चार संघांसह 'वर्ल्ड क्रिकेट लीग'मधील सर्वोत्तम चार आणि 'वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन 2'मधील दोन संघ खेळणार आहेत. पात्रता फेरीतील पहिले दोन संघ विश्‍वकरंडक स्पर्धेत दाखल होतील. 

विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ : 
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका.