खेळपट्टीपेक्षा लक्ष घोंघावणाऱ्या पावसावरच 

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियास जास्त होऊ शकेल; पण याऐवजी कोलकात्यात सुरू असलेला पाऊस उद्या (ता. 20) होणाऱ्या लढतीत किती खेळ होऊ देणार, याचीच चर्चा जास्त आहे. 

कोलकाता : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट लढतीसाठी तयार असलेल्या खेळपट्टीवर गवत आहे. त्याचा फायदा ऑस्ट्रेलियास जास्त होऊ शकेल; पण याऐवजी कोलकात्यात सुरू असलेला पाऊस उद्या (ता. 20) होणाऱ्या लढतीत किती खेळ होऊ देणार, याचीच चर्चा जास्त आहे. 

ऑस्ट्रेलियाची फिरकी मर्यादा श्रीलंकेत स्पष्ट झाली होती. बांगलादेशने हेच दाखवून दिले होते. भारतीयांनी पहिल्या एकदिवसीय लढतीतही कांगारूंना स्थिरावू दिले नाही. भारतीय फिरकीवर हल्ला करण्याची योजना युजवेंद्र चाहल आणि कुलदीप यादवने विफल ठरवली होती. आता या परिस्थितीत भारतीय फिरकीचा सामना करण्याची कांगारूंची किती मनःस्थिती असेल, हा प्रश्‍नच आहे. 

ऑस्ट्रेलियाने गेल्या दहा वन-डेपैकी एकच लढत जिंकली आहे. त्यांची खेळाडू रोटेट करण्याची योजना विफल ठरत आहे. त्याच वेळी भारताचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. 3 बाद 11 वरून गाठलेली 281ची मजल भारतास सुखावत आहे. त्याचबरोबर भारताने 163 धावांचा वीस षटकांत यशस्वी संरक्षण केले. 

कोलकात्यात ही लढत आहे. येथील आयपीएलमध्ये सीमर्सनी 16.4 च्या सरासरीने घेतलेल्या 61 विकेट्‌स कांगारूंना सुखावत आहेत; पण त्याच वेळी येथील फिरकीचे 23 बळी त्यांची चिंता वाढवत आहेत. एकंदरीत पावसाची खेळी किती निर्णायक ठरणार यावरच दोन्ही संघांचे गणित अवलंबून असेल. 

थोडक्‍यात वन-डे 

  • हवामानाचा अंदाज : काही दिवस जोरदार पाऊस, सामन्याच्या दिवशी दुपारी वादळी पावसाची शक्‍यता. भारतीय हवामान खात्यानुसार आकाश कायम ढगाळलेले. जोरदार सरी अपेक्षित. 
  • खेळपट्टीचा अंदाज : काही दिवस आच्छादित. त्यातच भारतीय खेळपट्ट्याच्या तुलनेत जास्तच गवत. त्यामुळे सीम गोलंदाजीस अनुकूल ठरण्याची शक्‍यता. 
  • संघात अपेक्षित बदल - भारत : मनीष पांडेऐवजी के. एल. राहुलला संधी देण्याचा विचार, बाकी बदलाची शक्‍यता कमी. ऑस्ट्रेलिया : पीटर हॅंडस्कोम्ब याला संधी देण्याचा विचार. त्याला घेताना कोणाला काढावे याऐवजी कोणाला ठेवावे, हाच प्रश्‍न.