हार्दिक पांड्याला बढती देण्याची कल्पना रवी शास्त्रींची : कोहली 

पीटीआय
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

मला डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाला लक्ष्य करायचे होते. आजच्या खेळीचे समाधान आहे; पण आता यापुढे सामना पूर्ण करण्याची जबाबदारी घ्यायची इच्छा आहे. 
- हार्दिक पांड्या

इंदूर : धडाकेबाज फलंदाज हार्दिक पांड्याला चौथ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा होता, अशी माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पांड्याने 72 चेंडूंत 78 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत सलग तीन विजय मिळवित भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली. रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी भक्कम सुरवात करून दिल्यानंतर पांड्याने फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियावर पूर्ण वर्चस्व गाजविले. एरवी सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पांड्याला या सामन्यात चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली होती. 

विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये कर्णधार कोहलीने पांड्याचेही कौतुक केले. "या विजयामुळे मी समाधानी आहे. पांड्या हा एक 'स्टार' आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सगळीकडे तो चमकत आहे. आम्हाला असाच खेळाडू हवा होता. या संघात एका स्फोटक अष्टपैलूची उणीव होती. ती आता भरून निघाली आहे. आजच्या सामन्यात त्याला बढती देण्याची कल्पना रवी शास्री यांची होती. ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांवर प्रतिहल्ला करण्यासाठी आम्ही ही योजना आखली,'' असे कोहली म्हणाला. 

आता मालिका जिंकल्यामुळे उर्वरित दोन सामन्यांत राखीव खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते, असे संकेतही कोहलीने दिले. 'आम्ही आता कदाचित इतर खेळाडूंनाही संधी देऊन पाहू शकतो; पण संघाच्या मानसिकतेत काहीही बदल होणार नाही. पाचव्या सामन्यानंतरच आमची मोहीम थांबेल', असे कोहलीने सांगितले.