आता परदेशात असे यश मिळवायला हवे : विराट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे यांनी चांगली सलामी दिली; परंतु डावाच्या मध्यावर आमच्याकडून चांगली फलंदाजी झाली नाही. असे कधी कधी घडते, कधी तरी दिवस आपला नसतो. 
- विराट कोहली, भारतीय कर्णधार 

बंगळूर : सलग नऊ विजयांची भारताची मालिका गुरुवारी (ता. 28) खंडित झाली असली, तरी कर्णधार विराट कोहलीने व्यापक चित्र पाहिले आहे. घरच्या मैदानावर मिळत असलेले हे यश जर आम्ही परदेशातही मिळवले, तर सध्याचा आमचा हा संघ एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ ठरू शकतो, असे मत विराटने व्यक्त केले. 

भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हा संघ सर्वोत्तम संघ ठरू शकतो, असा गौरव विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नावर विराट म्हणतो, ''गावसकर यांचे हे कौतुक अभिमानास्पद आहे. कारण गावसकर यांनी भारतीय संघाच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानाचे महत्त्व अधिक आहे. आम्ही सध्या चांगले यश मिळवत असलो तरी आमच्या तरुण संघाला अजून मोठा प्रवास करायचा आहे. सध्या आम्ही घरच्या मैदानावर खेळत आहोत; परंतु परदेशात प्रतिकूल परिस्थितीत या यशाची पुनरावृत्ती करू तेव्हा अधिक अभिमान वाटेल.'' चिन्नास्वामी स्टेडियमवरील सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कोहली या टीम इंडियाच्या भविष्याबाबतही मत व्यक्त करत होता. 

पहिल्या तीन सामन्यांत ऑस्ट्रेलियाला सळो की पळो करून सोडणाऱ्या भुवनेश्‍वर कुमार-जसप्रीत बुमरा आणि चायनामन कुलदीप यादव या तीन प्रमुख गोलंदाजांना गुरुवारच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आणि या संधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने 334 धावा उभारल्या. संघ व्यवस्थापनाच्या या बदलाचे कोहलीने समर्थन केले. आम्ही मालिका जिंकलेली आहे. त्यामुळे राखीव खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ होती. माझ्यामते उमेश यादव आणि महंमद शमी यांनी चांगली गोलंदाजी केली. उमेशने तर चार विकेट मिळवल्या. 

अमुक केले असते तर तमुक झाले असते, असा विचार करणारा मी नाही. तुम्ही प्रयत्न करत राहायला हवे. कधी कधी काही डावपेच यशस्वी ठरत नाहीत; परंतु प्रयत्न कायम ठेवायचे असतात, असा विचार मी करतो आणि संपूर्ण संघही करत असतो, असे विराटने स्पष्ट केले. 

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करत असताना हार्दिक पंड्या आणि केदार जाधवने अर्धशतकी भागीदारी करून आव्हान कायम ठेवले होते. या संदर्भात कोहली म्हणाला, ''जम बसवल्यानंतर संघाला विजय कसा मिळवून द्यायचा, याचा अनुभव देणारी ही चांगली संधी होती. या दोघांनी चांगली भागीदारी केली. त्यांनी अजून 40-50 धावांची भागीदारी केली असती तर चित्र कदाचित वेगळे दिसले असते; परंतु या वेळी ते यशस्वी ठरले नाहीत.''