मालिकेची सांगता विजयानेच; भारताचे पूर्ण वर्चस्व

नरेंद्र चोरे
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

नागपूर : आधी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी रोखल्यावर भारताच्या रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीनेच त्यांच्या गोलंदाजीवर निर्णायक घाव घालून मालिकेची सांगता विजयाने केली. भारताने रविवारी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून विजय मिळवत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. 

नागपूर : आधी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाची फलंदाजी रोखल्यावर भारताच्या रोहित शर्मा आणि अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीनेच त्यांच्या गोलंदाजीवर निर्णायक घाव घालून मालिकेची सांगता विजयाने केली. भारताने रविवारी येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून विजय मिळवत मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. 

व्हीसीएच्या जामठा स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या या औपचारिक लढतीत यजमान भारतीय संघाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस कामगिरी बजावली. फिरकी गोलंदाज आणि जसप्रीत बुमराने ऑस्ट्रेलियाला 242 धावांत रोखले. भारताने 42.5 षटकांतच 3 बाद 243 धावा करून थाटात विजय मिळविला. मालिकेत पहिले शतक झळकावणारा सामनावीर रोहित भारताच्या विजयाचा शिलेदार ठरला; तर मालिकेत अष्टपैलू प्रदर्शन करणाऱ्या हार्दिक पंड्याने मालिकावीर पुरस्कार पटकाविला. 

ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा व अजिंक्‍य रहाणे या सलामीच्या जोडीने पहिल्या गड्यासाठी 22.3 षटकांत 124 धावांची भागीदारी करून विजयाची भक्‍कम पायाभरणी केली. त्यानंतर मधल्या फळीतील उर्वरित फलंदाजांनी आवश्‍यक धावा काढून विजयावर शिक्‍कामोर्तब केले.

विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या शतकवीर रोहितने अकरा चौकार व पाच षटकारांसह 109 चेंडूंत 125 धावा काढल्या, तर रहाणेने सात चौकारांच्या मदतीने 74 चेंडूंत 61 धावांचे योगदान दिले. एकदिवसीय सामन्यांमध्ये सहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या विराटने 55 चेंडूंत 39 धावा फटकावल्या.

फलंदाजी करताना मधल्या षटकात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अडकून राहिली. गोलंदाजीत मात्र पहिल्या षटकापासून ते निष्प्रभ ठरत गेले. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मैदानावरील सलग तिसरा विजय मिळविला. यापूर्वी भारताने ऑक्‍टोबर 2009 मध्ये 99 धावांनी आणि ऑक्‍टोबर 2013 मध्ये सहा गड्यांनी पराभूत केले होते.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांनी पुन्हा एकदा दमदार सुरवात करून दिली होती. मात्र, पुन्हा एकदा डावाच्या मधल्या षटकांत त्यांना भारतीय गोलंदाजांनी त्रस्त केले. गेल्या दोन सामन्यांत त्यांनी हा फरक बऱ्यापैकी दूर करण्याचा प्रयत्न केला होता; पण या सामन्यात पुन्हा एकदा डावातील मधली आणि अखेरची षटके त्यांच्यासाठी कसोटीची ठरली. भारताने चौथ्या सामन्यातील अपयशानंतर पुन्हा भुवनेश्‍वर कुमार आणि जसप्रीत बुमरा हे गोलंदाज मैदानात उतरवले. 

या सामन्यातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला या वेळी भुवनेश्‍वर आणि जसप्रीतने जखडून ठेवले. अर्थात, स्थिरावल्यानंतर त्यांनी आपली आक्रमक फलंदाजी सुरू केली. वॉर्नर-फिंच जोडी या वेळेसही भारताची डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच मालिकेत फॉर्ममध्ये असलेल्या हार्दिक पंड्याने फिंचचा अडसर दूर केला. पुढे बदली गोलंदाज म्हणून संधी मिळाल्यावर केदार जाधवने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला बाद केले. या दोन धक्‍क्‍यांनंतर मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कधीच उंचावली नाही. अक्षर पटेलने वॉर्नर आणि पीटर हॅण्डसकॉम्ब यांना बाद करून त्यांच्या आव्हानातील हवा काढून घेतली. 

मधल्या षटकातील याच अचूक कामगिरीमुळे बिनबाद 66 अशी सुरवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा डाव 25व्या षटकांत 4 बाद 119 असा अडचणीत आला. मार्क्‌स स्टोईनिस आणि ट्राविस हेड यांनी बऱ्यापैकी फटकेबाजी केल्यामुळे त्यांना अडीचशेच्या जवळ पोचता आले. वॉर्नरची अर्धशतकी खेळी हीच काय ती ऑस्ट्रेलियाच्या डावात सर्वाधिक ठरली. स्टोईनिस आणि हेडची फटकेबाजी ही त्यांना दिलासा देणारी ठरली. 

संक्षिप्त धावफलक 
ऑस्ट्रेलिया : 50 षटकांत 9 बाद 242
(डेव्हिड वॉर्नर 53-62 चेंडू, 5 चौकार, एरॉन फिंच 32, स्टीव्ह स्मिथ 16, पीटर हॅण्डसकॉम्ब 13, ट्रॅव्हिस हेड 42, मार्कस स्टॉईनिस 46, मॅथ्यू वेड 20, भुवनेश्‍वरकुमार 1/40, जसप्रीत बुमरा 2/51, हार्दिक पंड्या 1/14, केदार जाधव 1/48, अक्षर पटेल 3/38) पराभूत वि. 
भारत : 42.5 षटकांत 3 बाद 243 धावा (अजिंक्‍य रहाणे 61-74 चेंडू, 7 चौकार, रोहित शर्मा 125-109 चेंडू,11 चौकार, 5 षट्‌कार, विराट कोहली 39, केदार जाधव नाबाद 5, मनीष पांडे नाबाद 11, ऍडम झम्पा 2/59)