भारत-न्यूझीलंड सामन्यासाठी 'एमसीए' मैदान सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

'एमसीए'चे स्वतंत्र मैदान तयार झाल्यापासून येथे होणारा हा तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचे सामने येथे खेळविण्यात आले होते. न्यूझीलंडचा पुणे शहरातील तिसरा सामना असला, तरी या मैदानावर ते प्रथमच खेळणार आहेत. यापूर्वीचे त्यांचे सामने नेहरू स्टेडियमवर झाले होते.

पुणे : एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मोसमात ऑस्ट्रेलियापाठोपाठ आता न्यूझीलंड भारताचा दौरा करणार असून, त्यांच्या विरुद्धच्या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना पुण्यात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर (25 ऑक्‍टोबर) होणार आहे. या सामन्यासाठी 'एमसीए' मैदान सज्ज झाले आहे. 

'एमसीए'चे स्वतंत्र मैदान तयार झाल्यापासून येथे होणारा हा तिसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धचे सामने येथे खेळविण्यात आले होते. न्यूझीलंडचा पुणे शहरातील तिसरा सामना असला, तरी या मैदानावर ते प्रथमच खेळणार आहेत. यापूर्वीचे त्यांचे सामने नेहरू स्टेडियमवर झाले होते. यातील एक सामना हा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड संघांदरम्यान झाला होता. या दोन्ही सामन्यांत न्यूझीलंडला पराभव पत्करावा लागला होता. 

या नव्या मैदानावर झालेल्या दोन एकदिवसीय सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव, तर इंग्लंडविरुद्ध विजय मिळविला आहे. इंग्लंडविरुद्धच्या विजयात केदार जाधव आणि विराट कोहलीच्या फलंदाजीचा आनंद पुणेकरांना अनुभवायला मिळाला होता. 

तिकीट विक्री 29 सप्टेंबरपासून! 
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या अधिकृत तिकीट विक्रीला महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) येत्या 29 सप्टेंबर 2017 (शुक्रवारी) सकाळी 10:00 वाजता सुरवात होईल.

क्रिकेटप्रेमींना दोन प्रकारे तिकीट विकत घेता येतील अशी सुविधा एमसीएने केली आहे. यात ऑनलाइन पर्याय असेल. त्यासाठी www.bookmyshow.com हे संकेतस्थळ आहे. याशिवाय प्रत्यक्ष तिकीट विक्री भांडारकर रोडवरील पीवायसी हिंदू जिमखाना आणि गहुंजे येथील एमसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या दोन्ही ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी तिकीट विक्रीची वेळ असेल. 

तिकीट दर पुढीलप्रमाणे :
वेस्ट स्टॅंड व ईस्ट स्टॅंड : 800/-
साऊथ अप्पर : 1100/-
साऊथ लोअर : 2000/-
साऊथ वेस्ट व साऊथ ईस्ट स्टॅंड : 1750/-
नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टॅंड : 1750/-
नॉर्थ स्टॅंड : 2000/-
साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी : 3500/-
(सर्व दर रुपयांत)