धोनी अजून 'संपलेला' नाही.. : रवी शास्त्री 

वृत्तसंस्था
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

संघामध्ये चांगल्या खेळाडूंना स्थान मिळते आणि धोनी हा सर्वोत्तम आहे. आपल्या देशात त्याच्यासारखा दर्जेदार यष्टिरक्षक दुसरा कुणीही नाही. 'तो खूप वर्षं खेळत आहे' म्हणून त्याची संघातील जागा दुसऱ्याला द्यायची?

पल्लिकल : 'महेंद्रसिंह धोनी अजून संपलेला नाही.. त्याच्यात अजूनही भरपूर क्षमता आहे.. 2019 च्या विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी तो संघासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीचे कौतुक केले. श्रीलंकेविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये धोनीला सूर गवसला आहे आणि तीन विजयांमध्ये त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. 

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील चार सामन्यांमध्ये धोनी तीन वेळा नाबाद राहिला आहे. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा देत विराट कोहलीसाठी मार्ग मोकळा करून दिला. धोनी सध्या 36 वर्षांचा आहे. त्यामुळे 2019 मधील विश्‍वकरंडक स्पर्धेमध्ये तो खेळू शकेल अथवा नाही, यासंदर्भात गेल्या वर्षभरापासून चर्चा सुरू आहे. 

शास्त्री म्हणाले, 'धोनीचा अनुभव प्रचंड आहे. त्यातून संघाला प्रेरणा मिळते. संघाच्या ड्रेसिंग रूममधील धोनी हा 'लिव्हिंग लिजेंड' आहे. तो अजून 'संपलेला' नाही. धोनी निवृत्तीच्या जवळ आला आहे, असे कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे. संघामध्ये चांगल्या खेळाडूंना स्थान मिळते आणि धोनी हा सर्वोत्तम आहे. आपल्या देशात त्याच्यासारखा दर्जेदार यष्टिरक्षक दुसरा कुणीही नाही. 'तो खूप वर्षं खेळत आहे' म्हणून त्याची संघातील जागा दुसऱ्याला द्यायची? सुनील गावसकर किंवा सचिन तेंडुलकर 36 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या निवृत्तीविषयी चर्चा झाली होती का?'' 

इंग्लंडमधील विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ मर्यादित षटकांचे 40 हून अधिक सामने खेळणार आहे. त्यामुळे खेळाडूंच्या विश्रांतीचे वेळापत्रकही लक्षात घ्यावे लागणार आहे. यासाठी बदली खेळाडूही तयार करावे लागणार आहेत. 'हे सर्व लक्षात घेता 18 ते 20 दर्जेदार खेळाडूंचा चमू तयार करायचा आहे. यातून विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडता येईल', असे शास्त्री म्हणाले.