मिस्बा-उल-हकची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

वृत्तसंस्था
गुरुवार, 6 एप्रिल 2017

माझ्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार आले आहेत. अनेकवेळा मला संघातून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले. तर, मी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधारही होतो.

लाहोर - पाकिस्तानचा कसोटी संघाचा कर्णधार मिस्बा-उल-हकने आगामी वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लाहोर येथे आज (गुरुवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत 42 वर्षीय मिस्बाने निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मी खेळत राहणार आहे, असे त्याने सांगितले. मिस्बा हा पाकिस्तानचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 53 सामन्यांपैकी 24 सामन्यांत पाकिस्तानने विजय मिळविलेला आहे.

मिस्बा म्हणाला, ''आगामी वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका माझी शेवटची मालिका असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. माझ्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक चढउतार आले आहेत. अनेकवेळा मला संघातून खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले. तर, मी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधारही होतो. त्यामुळे माझ्या कामगिरीने मी समाधानी आहे.''